हेमंत रासनेंच्या रॅलीत टिळक कुटुंब गैरहजर; नाराजीची चर्चा
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपमध्ये नाराजीचा सूर ऐकू येऊ लागलाय. भाजपनं कसब्यातून टिळकांच्या घरात तिकीट न देता, हेमंत रासनेंना तिकीट दिलंय. उमेदवारी न मिळाल्यामुळे शैलेश टिळक नाराज झाले. त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली. त्यानंतर आता त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. यासाठी २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कसबा गणपती मंदिरासमोर भाजपकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. कसबा गणपती मंदिर ते दगडूशेठ गणपती मंदिरापर्यंत मोठी पदयात्रा काढण्यात आली. यावेळी भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित दिसून येत आहेत. यात चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत पुण्यातील स्थानिक नेते सुद्धा दिसून आले. परंतू या पदयात्रेत शैलेश टिळक किंवा टिळक कुटुंबीयांचे कोणीच सदस्य या पदयात्रेत दिसले नाहीत. त्यामुळे टिळकांच्या घरात तिकीट न दिल्याने शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांची नाराजी उघडउघड दिसून आली आहे.
