कसबा मध्ये अखेर रवींद्र धंगेकर यांना महाविकास आघाडीची उमेदवारी
पुणे : कसबा विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढणार असून काँग्रेसच्या वतीने या मतदार संघातून अपेक्षेप्रमाणे ज्येष्ठ नगरसेवक रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीमध्ये धंगेकर विरुद्ध हेमंत रासने अशी तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे.
धंगेकर हे रविवार पेठ, कसबा पेठ परिसरातून सातत्याने 5 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. सर्वसामान्य जनतेत मिसळून काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. यामुळेच दोन वेळा शिवसेना, दोन वेळा मनसे आणि एकवेळ काँग्रेसचे सहयोगी नगरसेवक म्हणून ते निवडून आले आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसे कडून कसबा विधानसभा लढताना त्यांनी भाजपचे तगडे नेते गिरीष बापट यांना नाकीनऊ आणले होते. अवघ्या 7 हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. 2014 च्या निवडणुकीत ही त्यांना लक्षणीय मते मिळाली होती.
2017 च्या महापालिका निवडणुकीत त्यांना काँग्रेस मध्ये आणण्यास अन्य नेत्यांसोबतच काँग्रेसचे पदाधिकारी रोहित टिळक यांची महत्वाची भूमिका राहिली होती. टिळक यांनी त्यांना सर्वतोपरी मदत पुरवली होती. विशेष असे की यापूर्वी 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत टिळक आणि धंगेकर हे समोरासमोर उभे होते. त्यांच्यातील मत विभाजनामुळे तत्कालीन आमदार गिरीश बापट यांचा विजय अधिकच सुकर झाला होता. अशातच भाजपने दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांना उमेदवारी न दिल्याने टिळकांना मानणारा वर्ग धंगेकर यांच्या पाठीशी उभा राहण्याची दाट शक्यता आहे.
