महाराष्ट्र इंटकच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षपदी डॉ. कैलास कदम यांची निवड
मुंबई – राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक),महाराष्ट्र राज्याच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीच्या दि. ५ फेब्रुवारी, २०२३ रोजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी यांच्या आदेशानुसार सरचिटणीस श्री. गोविंदराव मोहिते यांच्या निरिक्षणात झालेल्या बैठकीत रिक्त असलेल्या महाराष्ट्र इंटकच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षपदी डॉ. कैलास कदम यांची निवड सर्वांनुमते करण्यात आली आहे.*
राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक), महाराष्ट्र शाखेच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीची बैठक डॉ. जी. संजीवा रेड्डी यांच्या आदेशानुसार दि. ५ फेब्रुवारी, २०२३ रोजी मामा फाळके सभागृह, राष्ट्रीय मिल मजदुर संघ (इंटक), ग.द. आंबेकर मार्ग, परळ, मुंबई येथे घेण्यात आली. सदर महाराष्ट्र इंटकल्या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर महाराष्ट्र इंटक मजबूत करण्यासंदर्भात सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रीय मजदुर कॉंग्रेस (इंटक) महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांच्या निधनामुळे महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष पद रिक्त झाले होते. राष्ट्रीय मजदुर काँग्रेस (इंटक) महाराष्ट्र शाखेच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीची मुदत दि. २४ फेब्रुवारी, २०२२ रोजी संपली आहे. सदर कार्यकारिणीची निवडणुक घेण्यासंदर्भात केंद्रीय इंटकने मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत
महाराष्ट्र इंटकचे कामकाज गतिमान करण्यासाठी रिक्त असलेल्या महाराष्ट्र इंटकच्या अध्यक्षपदाचा कार्यभार देण्यासाठी योग्य व्यक्तींची निवड होणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र इंटकच्या कार्यकारिणीची निवडणूक तात्काळ होणे आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्र इंटकच्या कामकाजात गती आणून कामगारांच्या प्रश्नांवर आवाज उठविणे व पुढील कामकाज करणे यासाठी नविन कार्यकारिणीची निवडणूक होवून नविन कार्यकारीणी होईपर्यंत राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) संघटनेचे वरिष्ठ राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र इंटकचे कार्याध्यक्ष डॉ. कैलास कदम यांना महाराष्ट्र इंटकच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्त करण्याचा निर्णय सर्वांनुमते घेण्यात आला.
या बैठकीस सरचिटणीस गोविंदराव मोहिते, कार्याध्यक्ष निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष हिंदुराव पाटील, विनोद पटोले, अशोक सिंग चव्हाण, मुंबई इंटकचे अध्यक्ष दिवाकर दळवी, जी. बी. गावडे, श्यामराव कुलकर्णी, महाराष्ट्र इंटकचे सचिव मुकेश तिगोटे, विठ्ठलराव कदम, बजरंग चव्हाण, स्मिता कुलकर्णी, तुकाराम ढेकाटे, दादाराव डोंगरे, सुनिल देसाई, शशिकांत धुमाळ, सुरेश सुर्यवंशी, सलाम शेख, ॲड. इंगळे, ॲड. देविदास काळे, गिरीश मेंगे, सोपान भोसले, सलाम शेख आदी महाराष्ट्र इंटकचे पदाधिकारी उपस्थित होते.
