Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनाही ‘महात्मा’ म्हटले पाहिजे – डॉ. श्रीपाल सबनीस 

पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना त्यांच्या सामाजिक कार्यात फक्त पाठिंबा दिला नाही तर त्यांच्या खांद्यालाखांदा लावून सहभाग घेतला.  आज 21 व्यय शतकातही विधवा स्त्रीचे बाळंतपण  होणे स्वीकारले जात नाही, मात्र सावित्रीबाई फुले यांनी दीडशे वर्षांपूर्वी विधवा स्त्री चे बाळंतपण  मंगलमय मानले आणि त्यांच्या उद्धारासाठी  कार्य केले. यामुळेच ज्योतिराव फुले  महात्मा होतेच पण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनाही ‘महात्मा’ म्हटले पाहिजे असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. 

ज्ञान फाउंडेशन च्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘सावित्रीची लेक पुरस्कार 2023’ या पुरस्कराने प्रसिद्ध लेखिका प्रा. राजकुंवर ग. सोनवणे,  पूना ब्लाँइंड मेन्स असोसिएशन प्रशिक्षण केंद्र रामटेकडी च्या अधीक्षक सुजाता या. टिळेकर, ज्ञानेश्वरी ग्रंथाचे हस्तलिखित करणाऱ्या अभियंता सुप्रिया प. शिळीमकर यांना सन्मानित करण्यात आले.  करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अभिजित वैद्य, ज्ञान फाउंडेशन चे अध्यक्ष मनोहर कोलते, पुणे महावितरण चे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, प्रकाश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, सावित्रीची लेक पुरस्कार देऊन सन्मानित केलेल्या आजच्या तीनही महिलांमध्ये सावित्रीचा अंश आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही कारण या प्रत्येकीने आपल्या क्षेत्रात संघर्ष करत समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे.

डॉ. अभिजित वैद्य म्हणाले, आज संवित्रीची लेक पुरस्काराने महिलांना सन्मानित करण्यात येत आहे. यानिमित्ताने मला सांगावे वाटते की आपण सावित्रीबाईंना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याची आज गरज आहे. महात्मा फुलेंनी निरक्षर पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या हाती लेखनी दिली मात्र त्या स्वतः विचारवंत झाल्या ही बाब अतिशय महत्वाची आहे. व्यवस्थेला आव्हान देणे म्हणजे सावित्री होय.

पुरस्काराला उत्तर देताना प्रा. राजकुंवर ग. सोनवणे म्हणाल्या, स्वातंत्र्यपूर्व काळात माझा अहमदनगर येथे जन्म झाले. मुलीच्या शिक्षणाला वडिलांचा विरोध होता तरीही आईच्या आग्रहामुळे मला सातवी पर्यंतचे शिक्षण मिळाले. पुढे लग्न झाले, त्यानंतर मी दहा वर्षांनी पुन्हा शिक्षणाची कास धरली कौटुंबिक, सामाजिक अडथळ्यांवर मात करत प्राध्यापिका झाले. गरीब घरातील मुलींचे शिक्षण अर्ध्यात सुटू नये यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले, सामाजिक परिवर्तनाचे नुसते लोकांना धडे दिले नाही तर आयुष्यभर वैज्ञानिक दृष्टिकोण ठेवला, स्वतच्या तीन मुलींना उच्चशिक्षित केले, एकीच्या आंतरजातीय विवाहला परवानगी दिली असेही त्यांनी नमूद केले.

पुरस्कार्थी  सुजाता टिळेकर, सुप्रिया शिळीमकर, राजेंद्र पवार यांनीही  यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मनोहर कोलते यांनी पुरस्कारामागील भूमिका विशद केली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चोरडिया यांनी केले. आभार भागवत थेटे यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading