चौकटीबाहेर जाऊन विचार करा; सातत्याने नाटक करा – ज्येष्ठ रंगकर्मी श्याम जोशी
पुणे : रंगकर्मींना स्वत:मधल्या कलाकाराची ओळख करून देणारी प्रयोगशाळा म्हणजे महाराष्ट्रीय कलोपासकची स्पर्धा होय. नाटक ही करून पाहण्याची, आनंद मिळविण्याची गोष्ट आहे. स्पर्धेत पारितोषिक मिळविणे महत्त्वाचे नसून चौकटी बाहेर जाऊन विचार करा, सातत्याने नाटक करा असा अनुभवाचा आणि मोलाचा सल्ला ज्येष्ठ लेखक, रंगकर्मी आणि वाणी संस्कार प्रशिक्षक श्याम जोशी यांनी शालेय विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना दिला. स्पर्धेत सातत्याने सहभाग घेतल्यास भविष्यात मोठे होण्याच्या वाटा दिसू लागतील असेही त्यांनी नमूद केले. पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.
महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे माध्यमिक शाळास्तरावर आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय नाटिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज (दि. 27) भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला होता. पारितोषिक वितरण श्याम जोशी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रीय कलोपासकचे अध्यक्ष अनंत निघोजकर, गंगोत्री होम्स अॅण्ड हॉलिडेजचे संचालक गणेश जाधव, मकरंद केळकर रंगमंचावर होते. स्पर्धेचे परिक्षण चिन्मय केळकर, दिगंबर निघोजकर आणि डॉ. मानसी मागीकर यांनी केले.
पारितोषिक वितरण समारंभापूर्वी राजा नातू करंडक पटकाविलेल्या आर्यन वर्ल्ड स्कूल वारजेच्या संघाने गोष्टींची गोष्ट तर नाविन्यूपर्ण व कल्पक सादरीकरणासाठी मथुरामाई करंडकाच्या मानकरी ठरलेल्या नुमवि मुलींची प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाने दर्पण ही नाटिका सादर केली.
श्याम जोशी पुढे म्हणाले, हरविणे आणि गवसणे हे आयुष्यभर चालूच असते त्यामुळे स्पर्धा केवळ पारितोषिके मिळविण्यासाठी नसतात. आयुष्यात विद्यार्थीपण जपा त्याचबरोरीने चौकटीबाहेर विचार करून कधीतरी कार्टेही व्हा, परंतु चौकटीबाहेर जाणे म्हणजे दुर्बोधता अपेक्षित नाही. कधीतरी शाळा बुडली तरी चालेल पण स्पर्धा बुडता कामा नये असे सांगत ते पुढे म्हणाले, नाटक ही अभ्यासपूर्ण सौंदर्यमय कला आहे. प्रेक्षक कलाकारांशी खेळतात याची दृष्टी प्राप्त होणे म्हणजे नाटक होय. सरळपणात वळण हे शास्त्रात नसते परंतु कलेत असते असेही त्यांनी सूचित केले.
परिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना चिन्मन केळकर म्हणाले, स्पर्धांच्या माध्यमातून कलाकार तर घडतीलच परंतु उत्तम प्रेक्षक तयार होणे शक्य आहे. कारण नाटक ही जीवंत कला आहे म्हणजे त्यात प्रेक्षक हा महत्त्वाचा भाग आहे. इतर माध्यमात प्रेक्षक हा घटक नंतर येतो; परंतु नाटक सादरीकरण करताना प्रेक्षक आणि कलाकार दोनही घटक एकाच वेळी अनुभूती घेत असतात. लेखन, सादरीकरण, दिग्दर्शन यात काय सुधारणा व्हाव्यात या विषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
गणेश जाधव म्हणाले, स्पर्धेनिमित्त मुलांचा प्रवास नाटकाभोवती झालेला जाणवला. या प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले याचा आनंद आहे. अशा स्पर्धांमधून समाज घडविणे, कशासाठी जगायचे याचे मार्गदर्शन मिळते.
मान्यवरांचा सत्कार अनंत निघोजकर यांनी केला. पुरस्कारांसाठी सहकार्य करणार्या मान्यवरांचा सत्कार श्याम जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन अश्विनी वाघ यांनी केले तर निकालाची घोषणा आणि आभार प्रदर्शन संस्थेचे चिटणीस अॅड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी केले.
