Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

नाट्यसंगीत सादरीकरणात तारतम्य ठेवणे आवश्यक : बकुळ पंडित

पुणे : नाट्यसंगीत गाणे सोपे नाही. हा उपशास्त्रीय संगीत प्रकार गाण्यासाठी साहित्याची, शब्दांची आणि भावानुकूलतेची जाण असणे आवश्यक आहे. तालासुरात गायन म्हणजे गाणे नव्हे. गाण्यातील सुंदरता म्हणजे त्यातील भाव, लालित्य, गोडवा, आर्जव. नाट्यसंगीत गाताना मर्यादेबरोबरच तारतम्यही ठेवावे लागते, असे प्रतिपादन ज्येष्ठ गायक अभिनेत्री बकुळ पंडित यांनी केले. तारतम्य ठेऊन नाट्यसंगीत सादर केल्यास नाट्यसंगीताची कट्यार काळजात घुसते. त्या कट्यारीने आपण रक्तबंबाळ नव्हे तर आनंदबंबाळ होतो अशी टिप्पणही त्यांनी केली.
भरत नाट्य संशोधन मंदिर आणि लायन्स क्लब ऑफ पुणे, सहकारनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र गंधर्व नाट्य संगीत स्पर्धेचे आयोजन भरत नाट्य मंदिरात करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांना बकुळ पंडित यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, कार्याध्यक्ष आणि स्पर्धा संयोजक अभय जबडे, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल चंद्रशेखर सेठ, द्वितीय प्रांतपल सुनील चेकर, व्हिजन इंडस्ट्रीयल हबच्या संचालक लता जैन, लायन डॉ. प्रसाद खंडागळे रंगमंचावर होते. संपदा थिटे, आलापिनी जोशी, शुभदा आठवले यांनी स्पर्धेचे परिक्षण केले.
आज नवीन संगीत नाटके येत नाहीत; नवीन संहिता लिहिल्या जात नाहीत ही वस्तूस्थिती आहे. पण संगीत नाटके जिवंत ठेवण्यासाठी ज्या मोजक्या संस्था आहेत त्यात भरत नाट्य संशोधन मंदिर ही अग्रगण्य संस्था आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख करून बकुळ पंडित पुढे म्हणाल्या, संस्थेने संगीत नाटक आणि नाट्यसंगीताची जपणूक समर्पण भावनेने केली आहे. स्पर्धेसाठी लायन्स क्लबने सहकार्य केल्याबद्दल लायन्स क्लबचेही त्यांनी कौतुक केले.
परिक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना संपदा थिटे म्हणाल्या, नाट्यसंगीत सादर करताना त्यातील नाट्य आणि भाव दिसला पाहिजे. नाटकामध्ये नाट्यपद कशा पद्धतीने सादर केले गेले आहे याचाही अभ्यास असणे आवश्यक असते. जी व्यक्तिरेखा नाट्यसंगीत सादर करत आहे त्याचा अभ्यास केल्यास सादरीकरणातील नाट्य सापडू शकते, भाव पकडता येऊ शकतो. शब्द, ताल, स्वर जेवढा महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे स्वरामागील अर्थ उमगणेही गरजेचे असते.
पांडुरंग मुखडे यांनी कलाकारांच्या सादरीकणाचे कौतुक केले. पारितोषिकाकडे लक्ष ठेऊन सादरीकरण करू नका असा सल्ला चंद्रशेखर सेठ यांनी स्पर्धकांना दिला.
मान्यवरांचे स्वागत करून लायन डॉ. प्रसाद खंडागळे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात स्पर्धेविषयी माहिती दिली तसेच भरत नाट्य मंदिराबरोबर स्पर्धा कायमस्वरूपी घेण्याचा मनोदयही व्यक्त केला. सुनील चेकर यांनी मनोगत व्यक्त केले. बकुळ पंडित यांचा परिचय भरत नाट्य मंदिराचे विश्वस्त रवींद्र खरे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन प्रकाश नारके, लायन निलम खंडागळे यांनी केले. भरत नाट्य मंदिराचे कार्याध्यक्ष अभय जबडे यांनी आभार मानले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
गट पहिला (वय 8 ते 15) – प्रथम – तनय अमित नाझिरकर (रोख रु. 5 हजार आणि स्मृतिचिन्ह). द्वितीय – अर्णव निशिकांत पुजारी (रोख रू. 3 हजार). उत्तेजनार्थ – स्वरा उदय आरणके, शर्वरी राहुल वाकडे, अवनी योगेश भाले (रोख रू. एक हजार प्रत्येकी.)
गट दुसरा (वय 16 ते 40) – प्रथम – मयुरी हेमंत अत्रे (रोख रू. 7 हजार आणि स्मृतिचिन्ह). द्वितीय – सोजी सी मॅथ्यू जॉर्ज (रोख रू. 5 हजार). उत्तेजनार्थ – श्रीया शिंदे, निशांत खळदकर, चिन्मय चंद्रकांत अलाट (रोख रू. 2 हजार प्रत्येकी).
गट तिसरा (वय 41 ते 60) – द्वितीय – स्वरूपा करंदीकर (रोख रू. 5 हजार). उत्तेजनार्थ – मंजिरी प्रदीप काळे, स्नेहल अभिजित जायदे (रोख रू. 2 हजार प्रत्येकी).

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading