Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

बालसाहित्य चळवळीला बळ मिळण्यासाठी वाचन संस्कार रूजवणे आवश्यक – राजन लाखे

पुणेः- बालवयातच साहित्य आणि वाचनाचे संस्कार रूजवले गेले, तर बालसाहित्य चळवळीला बळ मिळेल, असे मत ज्येष्ठ कवी आणि अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजन लाखे यांनी व्यक्त केले.   

अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच ज्येष्ठ कवी राजन लाखे यांची निवड झाली आहे. याबद्दल विदिशा विचार मंचतर्फे राजन लाखे यांच्यासह संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार आज ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिक  डॉ.न.म. जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानिमित्त विदिशा विचार मंचच्या  संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत राजन लाखे बोलत होते. 
पत्रकार भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे उपाध्यक्ष विलास रासकर, कार्यवाह दिलीप गरूड, सहकार्यवाह भरत सुरसे, कोषाध्यक्ष बाळकृष्ण माडगूळकर आणि कार्यकारिणी सदस्य विजय जगताप, सीमा चव्हाण, मीरा शिंदे, विनोद वाघ, कविता मेहेंदळे आणि विश्वनाथ भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला. 

यावेळी प्रकट मुलाखतीव्दारे अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे भविष्यातील उपक्रम आणि मराठी बालसाहित्य चळवळी संदर्भात राजन लाखे यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी राजन लाखे म्हणाले की, बालसाहित्यात संस्थात्मक आणि शासन पातळीवर एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. मराठी बाल साहित्य चळवळ ग्रामीण आणि शहरी भागात विविध उपक्रमांच्या माध्यमातून पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात असून तो स्वागतार्ह आहे. मात्र, या प्रयत्नांमध्ये  विविध संस्थांनी समन्वय साधून काम केले पाहिजे.  अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या कार्याची सूत्रे आम्ही अलीकडेच स्वीकारली असली, तरी संपूर्ण कार्याकरिणी जोमाने कामाला लागली आहे. अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेची नवीन शाखा लातूर येथे नुकतीच सुरू करण्यात आली असून तिच्या सहकार्याने लातूरमध्ये बालसाहित्य संमेलन देखील नुकतेच संपन्न झाले. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात ज्या ज्या ठिकाणी मराठी भाषिक आहेत, तिथे तिथे पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांमध्ये विविध संस्था, पालक, शिक्षक आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नजीकच्या काळात शिवार बालसाहित्य संमेलन, शिक्षकांसाठी कार्यशाळा, भाषेवर आधारित स्पर्धात्मक उपक्रम अशा विविध माध्यमातून या चळवळीला पाठबळ देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असेही राजन लाखे यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी बोलताना डॉ.न.म. जोशी म्हणाले की, देशाच्या, समाजाच्या संस्कृती आणि साहित्य क्षेत्रात सध्या जी परिस्थिती आहे, त्यामध्ये बदल करण्यासाठी साहित्य क्षेत्रातील व्यक्तींनी झटून काम करण्याची गरज आहे. मी वयाच्या आठव्या वर्षी सामाजिक कार्यात उतरलो आणि गेली 70 वर्षे मी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सभासद आहे. या सगळ्याच्या माध्यमातून मी उघड्या डोळ्यांनी समाज पाहतो आहे आणि सार्वजनिक क्षेत्रात वावरतो आहे. या काळात अनेक प्रकारच्या व्यक्ती आणि संस्थांशी संपर्क आला. अनेक प्रसंग आणि घटना पहायला, अनुभवायला मिळाल्या. या सगळ्यामध्ये माणसाने माणसाशी माणसासरखे वागणे अतिशय आवश्यक आहे.  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ममता क्षेमकल्याणी यांनी केले. सूत्रसंचालन योगेश रांगणेकर यांनी केले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading