fbpx

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा

पुणे  -जिल्हाधिकारी कार्यालयात १३ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मतदार नोंदणीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचा सत्कार करण्यात आला.

अपर जिल्हाधिकारी विजय मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, २१४ पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे, डॉ.पी.ए.इनामदार, तहसीलदार स्वाती रेडेकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री.मोरे म्हणाले,लोकशाही व्यवस्थेत निवडणुकांना अनन्यसाधारण महत्व आहे. भारतात निवडणूका मुक्त आणि निष्पक्ष होण्याचे श्रेय निवडणूक यंत्रणा आणि सर्वसमावेशक मतदार यादीला आहे. देशात लोकशाही रुजल्याने देश जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था झाला आहे. मतदार यादी प्रकाशित झाल्यानंतर प्रत्येक मतदाराने आपले नाव आणि तपशील तपासावा आणि पात्र युवकांनी मतदार यादीत नाव नोंदवावे असे आवाहन केले.

यावेळी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ घेण्यात आली. प्रास्ताविकात श्रीमती रेडकर यांनी राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाबाबत माहिती दिली. ‘मतदानाइतके अमूल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकार आम्ही’ ही संकल्पना यावर्षी मतदार जागृतीसाठी घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

मान्यवरांच्या हस्ते नवमतदारांना प्रातिनिधिक स्वरूपात मतदार ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. मतदार नोंदणी शिबिर आयोजनासाठी सहकार्य करणारी महाविद्यालये, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी यांना यावेळी गौरविण्यात आले. मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण आणि छायाचित्र मतदार यादी तयार करण्यात चांगली कामगिरी करणारे मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी,नायब तहसीलदार, केंद्रस्तरीय अधिकारी, कर्मचारी यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

%d bloggers like this: