fbpx

उद्यापासून एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शन सुरु

२५ ते २९ जानेवारी २०२३ दरम्यान चालणार

पुणे : एम्प्रेस गार्डनच्या वतीने दर वर्षी पुष्पप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असते , परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे पुष्पप्रदर्शन घेण्यात आले नव्हते . दोन वर्षांनंतर पुन्हा पुष्पप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून त्याचे उद्घाटन बुधवार दि. २५ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १२.३० वा. होणार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. दि. २५ जानेवारी २०२३ रोजी दुपारी १.०० ते रात्रौ ८.०० आणि २६, २७, २८ आणि २९ जानेवारी या दिवसांमध्ये सकाळी ९ ते रात्रौ ८ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील. या वर्षीचे प्रदर्शन संस्थेचे मा. अध्यक्ष स्व. श्री. राहुल बजाज यांच्या स्मृतीस अर्पित करीत आहोत.

अग्री हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया ही संस्था निसर्ग संवर्धनाचे कार्य करणारी पुण्यातील सर्वात जुनी व अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेमार्फत निसर्गसंवर्धनाचे अनेक उपक्रम वर्षानुवर्षे राबविले जात आहेत. त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे एम्प्रेस गार्डन.एम्प्रेस गार्डन ही पुण्यातील एक ऐतिहासिक बाग असून, अग्री हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेकडे अगदी एम्प्रेस गार्डनच्या निर्मिती पासून व्यवस्थापनाची जबाबदारी आहे आणि आजवर संस्थेने ती समर्थपणे पेललेली आहे. ही जबाबदारी सांभाळत असताना अथवा बागेमध्ये काही उद्देशपर निर्मिती अथवा नूतनीकरणाची कामे करत असताना, बागेच्या मुख्य रचनेमध्ये कुठेही बदल न करता बागेची नैसर्गिकता जाणीवपूर्वक जपलेली आहे.

तसेच बागेला साजेशी कामे आजवर बागेमध्ये केलेली आहेत. यामुळे बाग अजूनच खुलून दिसते. एरवी एम्प्रेस गार्डन प्रसिद्ध आहे ती मनोरंजनाचे, पर्यटनाचे तसेच वनस्पतीशास्त्रीय अभ्यासाचे केंद्र म्हणून हा दृष्टीकोन समोर ठेवून वर्षभर नव-नवीन उपक्रम बागेमध्ये राबविले जातात. यामध्ये अगदी लहानांपासून थोरांचा सहभाग असतो.

संस्थेमार्फत अगदी १०० वर्षापूर्वीपासून जनमानसात निसर्गाबद्दल आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने पुष्पप्रदर्शने भरविली जात होती. मध्ये काही कालावधीचा खंड वगळता संस्थेने आजवर ती परंपरा कायम ठेवलेली आहे.

बागेमध्ये पुन्हा नव्याने पुष्पप्रदर्शन भरविण्यास जानेवारी, १९९८ सालापासून सुरूवात झाली. अगदी पहिल्या प्रदर्शनापासून पुणेकरांनी यास उस्फूर्त प्रतिसाद दिला.

पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने पुण्यातूनच नव्हे तर अगदी कोल्हापूर, सांगली, नाशिक, आंध्र प्रदेश इ. ठिकाणाहून नर्सरी व्यावसायिक या पुष्पप्रदर्शना मध्ये सहभागी होण्याकरिता येत असतात.

या पुष्पप्रदर्शनाचे वैशिष्ठ्य म्हणजे यामध्ये केवळ फुलांचा समावेश न करता निरनिराळ्या प्रकारच्या शोभिवंत झाडांच्या कुंड्या, भाजीपाला, पुष्परचना, बागेच्या प्रतिकृती इ. गोष्टींचा समावेश असतो.
पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने दरवर्षी खास मुलांसाठी चित्रकला व हस्ताक्षर लेखन स्पर्धा देखील आयोजित करण्यात येतात. या स्पर्धेस निरनिराळ्या शाळांमधून सुमारे १००० विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. यंदाच्या वर्षी देखील शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व हस्ताक्षर लेखन स्पर्धा रविवार दि. २२ जाने. २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

पुष्पप्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण असते ते म्हणजे विविध प्रकारच्या पुष्परचना. यंदाच्या वर्षीदेखील) जपानी पध्दतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोन्साय वृक्षांचे विविध प्रकार स्पर्धकांनी साकारलेल्या विविध कलाकृती या पुष्पप्रेमींच्या पसंतीस नक्कीच उतरतील,

एरवी केवळ पानांनी, वेलींनी व हिरवाईने नटलेली एम्प्रेस गार्डन पुष्पप्रदर्शनाच्या निमित्ताने फुललेली पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: