Thursday, August 27, 2026
Latest NewsPUNE

१६ व्या ‘वसंतोत्सव’ला उद्यापासून सुरुवात

पुणे : पुनीत बालन समूह प्रस्तुत आणि डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या १६ व्या ‘वसंतोत्सव’ला उद्या (दि.२० जानेवारी) पासून सुरुवात होणार  आहे. यावर्षीच्या महोत्सवात कै. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना मानवंदना देण्यात येणार आहे. याबरोबरच अजिंठा वेरूळ लेण्यांतील शिल्पांच्या संकल्पनेवर आधारित रंगमंच व्यवस्था हे यावर्षीच्या महोत्सवाचे खास आकर्षण असेल, अशी माहिती राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी कळविली आहे.

यावर्षीचा महोत्सव कोथरूड येथील म्हातोबा दरा, पेठकर साम्राज्य समोरील सुर्यकांत काकडे फार्म्स या ठिकाणी शुक्रवार २० जानेवारी ते रविवार २२ जानेवारी, २०२३ सायं ५ ते रात्री १० या वेळेत संपन्न होणार आहे. शास्त्रीय गायन, तालवाद्य, लाईट म्युझिक, लाईव्ह बँड यांबरोबर बहारदार गझल्स अशा एकाहून एक वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी महोत्सवादरम्यान रसिकांना अनुभविता येणार आहे. शिवाय राहुल देशपांडे हे आपल्या गायनाद्वारे गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांना मानवंदना वाहतील.

वसंतोत्सवाच्या पाहिल्या दिवशी अर्थात दि. २० जानेवारीच्या पहिल्या सत्रात गायिका कौशिकी चक्रबर्ती यांचे सुरेल गायन होईल. त्यानंतर राहुल देशपांडे यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. पहिल्या दिवसाचा शेवट कौशिकी चक्रबर्ती व राहुल देशपांडे यांच्या बहारदार सहगायनाने होईल. अशा पद्धतीने हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र सादरीकरण करणार आहेत.

शनिवार दि. २१ जानेवारीच्या पहिल्या सत्रात ‘द रघु दीक्षित प्रोजेक्ट’ या सुप्रसिद्ध कन्टेम्पररी व भारतीय लोकसंगीतावर आधारित बँडचे सादरीकरण होणार आहे. यानंतर प्रसिद्ध पार्श्वगायिका प्रतिभा सिंह बघेल यांचे व गायक पृथ्वी गंधर्व यांचे एकल गझल गायन होईल. दुस-या दिवसाचा समारोप या दोघांच्या एकत्रित गझल गायनाने होईल.

रविवार, दि. २२ जानेवारी रोजी वसंतोत्सवच्या तिस-या दिवसाची सुरुवात सुप्रसिद्ध पार्श्वगायिका मधुश्री भट्टाचार्य यांच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमाने होईल. यानंतर गायक, संगीतकार व चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा ‘म्युझिक अँड मोर’ हा कार्यक्रम होईल. तर १६ व्या वसंतोत्सवाची सांगता सुप्रसिद्ध सतारवादक नीलाद्री कुमार याच्या वादनाने होईल.

स्व. पं. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीनिमित्त महोत्सवाच्या दरम्यान देण्यात येणारा ‘वसंतोत्सव पुरस्कार’ यंदा ग्वाल्हेर-आग्रा परंपरेतील ज्येष्ठ गायिका गुरु विदुषी शुभदा पराडकर, संगीत संशोधिका व लेखिका डॉ. शुभदा कुलकर्णी आणि युवा तबलावादक कार्तिकस्वामी दहिफळे यांना प्रदान करण्यात येईल. पुरस्काराचे हे ९ वे वर्ष असून, संगीत शिक्षक व संशोधक यांना मानपत्र व रोख ५१,००० रुपये तर युवा कलाकारास मानपत्र व रोख २५,००० रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading