Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

सृजन-कोहिनूर पुरस्कार म्हणजे डॉ. विनोद शहा यांच्या सेवा कार्याचा सन्मान : अभय फिरोदिया

पुणे : विभक्त कुटुंबपद्धती वाढीस लागल्यामुळे कुटुंबातील धार्मिक मूल्यांवरील लक्ष उडत चालले आहे, परिवार व्यवस्था ढासळते आहे. अशा परिस्थितीत सेवा हा भारतीय परंपरेचा पाया अंगीकारून तसेच लोकांचे दु:ख ओळखून डॉ. विनोद शहा कार्यरत आहेत. हा सत्कार म्हणजे त्यांच्या कार्याचा, परंपरेचा सन्मान आहे, असे गौरवोद्गार विख्यात उद्योगपती पद्मश्री अभय फिरोदिया यांनी काढले. वृद्धांच्या समस्या येत्या काही वर्षात अनेक पटींने वाढण्याची शक्यता असल्याने ज्येष्ठांनी सेवाकार्यासाठी पुढे यावे आणि निवाऱ्याबरोबर सहाराही बनावे असे आवाहनही त्यांनी केले.

सृजन महोत्सवात अखेरच्या दिवशी (दि. 15) जनसेवा फाउंडेशनचे प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ. विनोद शहा आणि मीना शहा यांना फिरोदिया यांच्या हस्ते सृजन-कोहिनूर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार, लेखक विजय कुवळेकर होते. उद्योगपती कृष्णकुमार गोयल, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पायगुडे व्यासपीठावर होते. शाल, श्रीफळ, मानचिन्ह व रोख रुपये 21,000/- असे पुरस्काराचे स्वरूप होते. सृजन फाउंडेशनचे कार्य पाहून डॉ. शहा यांनी पुरस्काराची रक्कम फाउंडेशनच्या इतर उपक्रमांसाठी वापरावी असे सांगून नम्रपणे परत केली.

अभय फिरोदिया म्हणाले, समाजाचे दु:ख ओळखणे, त्यावर उपाय करणे त्यासाठी जीवापाड मेहनत करणे आणि ते करीत असताना स्वत:ला मोठे न समजणे हा गुण भारतीय परंपरेत आहे. अशा व्यक्तींची संख्या खूप कमी असून सेवाभावाने कार्य करणारे डॉ. शहा त्यातील एक आहेत. आयुष्यात मूल्यांना धरून चालणारे तरतात. निरपेक्षपणे वृद्धांची, रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉ. शहा यांना समाजाने आपल्या परीने हातभार लावावा, त्यांच्या समाजकार्याची जागृती करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. संत विचारांवर आधारित नॉलेज गॅलरी उभाण्याचे काम सध्या सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना डॉ. विनादे शहा म्हणाले, लौकिकदृष्ट्या श्रीमंत असलो तरी मी मनाने गरीब आहे. गरीबीची जाण आणि भान असल्याने, आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेने कार्यरत आहे. हे काम आनंद देणारे आहे. माझे रुग्णालय हे माझे मंदिर असून ‘रुग्ण देवो भव’ या उक्तीने कार्यरत राहून मी मंदिरात पुजाऱ्याची भूमिका करीत आहे. पत्नी आणि कुटुंबाने आधार आणि प्रोत्साहन दिल्यानेच मी अखंडितपणे कार्यरत आहे. सेवा करणे सोपे नाही, पण सतत प्रयत्नशील राहिल्याने मी हे सेवाकार्य अवितरपणे पुढे नेत आहे. सेवाकार्याचा हा रथ जगन्नाथाचा आहे, माझ्या मनात शेवटपर्यंत कृतज्ञतेची भावना जागृत राहून हे कार्य सुरू राहावे, असा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. ‘प्रभो मज अन्य नको वरदान’ असे सांगून ‘स्वस्थ रहो-व्यस्त; रहो-मस्त रहो’ असा संदेशही त्यांनी दिला.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विजय कुवळेकर म्हणाले, आजच्या काळात भौतिक प्रगती होत असली तरी नैतिक अधोगती होत आहे. विभक्त कुटुंब व्यवस्थेत आत्मकेंद्रियता वाढू लागली आहे. पदवी आणि शहाणपणा याची फारकत आहे का याविषयी जाहीरपणे चर्चा केली पाहिजे. एकत्र कुटुंब व्यवस्थेबद्दल समाजात विशेषत: तरुणांमध्ये संवेदना निर्माण करणे ही काळाची गरज आहे. वृद्धांचे गुण-दोष स्वीकारून त्यांचा सांभाळ कसा करावा याचे प्रशिक्षण आजच्या तरुणांना देता येईल का या प्रश्नाकडेही त्यांनी लक्ष वेधले. मानवसेवेला केलेला मानचा मुजरा म्हणजे हा सृजन-कोहिनूर पुरस्कार असल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्योगपती कृष्णकुमार गोयल स्वागत करताना म्हणाले, विविध क्षेत्रात आपल्या कार्याने उंची गाठणाऱ्या व्यक्तींना सृजन-कोहिनूर पुरस्काराने गौरविले जाते. डॉ. शहा यांना हा पुरस्कार प्रदान केल्यामुळे या पुरस्काराची उंची वाढली आहे.
प्रास्ताविकात प्रकाश पायगुडे म्हणाले, सृजन-कोहिनूर पुरस्काराने केवळ डॉ. शहा यांचाच गौरव होत नसून पुणे शहराचाही गौरव होत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी तर आभार पोपटलाल शिंगवी यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading