Monday, June 22, 2026
Latest NewsPUNE

पारंपरिक लोककलांच्या माध्यमातून जनजागृती


पुणे : पोवाडा, शाहिरी, गोंधळ, भारूड अशा लोककलांच्या जागरातून समाजातील अनिष्ट प्रथांविरोधात युवा शाहीर रामानंद उगले (जालना) यांनी महाराष्ट्राची लोकगाणी या कार्यक्रमातून जनजागृती करीत प्रबोधन केले.
सृजन फाउंडेशन आणि कोहिनूर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने लोककला या संकल्पेनवर आधारित सृजन-कोहिनूर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी (दि. 14) युवा शाहीर रामानंद उगले आणि सहकाऱ्यांचे दमदार सादरीकरण झाले. शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष रवी चौधरी, सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश पायगुडे, विश्वस्त अधिश पायगुडे, पोपटलाल शिंगवी, रामचंद्र शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोककलांची पारंपरिकता जपत आजच्या काळाला अनुसरून अनेक सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकत पोवाडा, शाहिरी, गोंधळ, भारूड, पोतराज, वासुदेव यांच्या माध्यमातून नव्या आणि सुधारणावादी विचारांची दिशा दाखविली. आप्पासाहेब उगले यांनी रचलेल्या ‘श्री गणेशा परंपरेशा’ या गणेशस्तवनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला.
शिक्षणाचे तसेच स्वच्छतेचे महत्व, महिला बचत गटांची उपयुक्तता सांगत आजच्या काळातील समाजमाध्यमांच्या आहारी जाणाऱ्या युवा पिढीला योग्य मार्ग दाखविणाऱ्या कल्याण उगले लिखित ‘फेसबुकचे गाणे’ या विनोदी काव्याला रसिकांची भरभरून दाद मिळाली.
पूर्वीच्या काळी येणारा वासुदेव हा फक्त महाभारत, रामायणाच्या कथा सांगायचा पण आजचा वासुदेव स्वच्छतेचे महत्व, मुलांच्या शिक्षणाचे महत्व विशद करून लोककलेच्या माध्यमातून मनोरंजन करीत जनजागृतीही करीत असल्याचे युवा शाहीर रामानंद उगले म्हणाले.
आप्पासाहेब उगले, शाहीर श्रीकांत शिर्के, ज्ञानेश्वर पवार, ज्ञानेश उगले, सुनील उगले, नेहा खंडागळे यांनी पारंपरिक रचना सादर केल्या तर कल्याण उगले (ढोलकी), विशाल उगले (संबळ), सागर उदावंत (तबला), दत्ता गवारे (हार्मोनियम), स्वप्निल घाटोळे (की-बोर्ड) यांनी साथसंगत केली. शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष रवी चौधरी यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
सृजन महोत्सवात अखेरच्या दिवशी (दि. 15) जनसेवा फाऊंडेशनचे प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉ. विनोद शहा यांना सृजन पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. पुरस्कार वितरण विख्यात उद्योगपती पद्मश्री अभय फिरोदिया यांच्या हस्ते होणार असून शाल, श्रीफळ, मानचिन्ह व रोख रुपये 21,000/- असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार, लेखक विजय कुवळेकर, उद्योगपती कृष्णकुमार गोयल, प्रसिद्ध निरुपणकार उल्हास पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading