Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

जनसंघ, भाजपाने तत्वांशी व मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही – सुनील देवधर

पुणे : जनसंघाच्या, भाजपच्या तत्वांशी, मुल्यांशी श्‍यामाप्रसाद मुखर्जी, दिनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या नेत्यांनी कधीही तडजोड केली नाही. बहुमत असते, तर अटलबिहारी वाजपेयी यांनी ३७० कलमही रद्द केले असते. कलम किंवा राम मंदिराचे त्यांचे स्वप्न सत्यात उतरविण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे, असे मत भाजपचे अखिल भारतीय सचिव सुनील देवधर यांनी व्यक्त केले.

आधार सोशल फाऊंडेशनतर्फे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ टिळक स्मारक मंदिर येथे अटल शक्ती व अटल साधना पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुनील कांबळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, भाजपचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी नगरसेवक हेमंत रासने, धीरज घाटे, शैलेश टिळक, राजेंद्र हिरेमठ, आयोजक दिलीप काळोखे, सविता काळोखे, राजेंद्र हिरेमठ आदी उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप यांना अटल शक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रुपये ५१ हजार, मानपत्र, मानचिन्ह, शाल असे सन्मानाचे स्वरूप होते. तर शाहीर दादा पासलकर, शिल्पकार अभिजित धोंडफळे, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद देवल, सामाजिक कार्यकर्त्या नलिनी वायाळ – गावडे, ऍड.मारुती गोळे यांना अटल साधना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सुनील देवधर म्हणाले, यापूर्वी आपल्या कामांचे प्रोफाईल घेऊन फिरणाऱ्या, चमचागिरी करणाऱ्यांना पद्मश्री, पद्म विभूषण असे पुरस्कार मिळत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा ट्रेंड बदलला. ज्यांनी खरच चांगले काम केले आहे, त्यांनाच आता पद्मश्री, पद्म विभूषण सारखे उच्च पुरस्कार मिळतात.

चंद्रकांत पाटील म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी यांनी केवळ देशालाच नाही, तर जगाला दिशा दिली, त्यांनी राष्ट्राचा कायम विचार केला. शेवटच्या क्षणापर्यंत देशासाठी काम केले. देशात कॉंग्रेस व्यतिरिक्त अनेक पंतप्रधान झाले, पण वाजपेयी यांचे पंतप्रधान म्हणून मोठे कार्य आहे. म्हणूनच त्यांच्या सारख्या तपस्वीच्या नावाने मिळालेला पुरस्कार खूप महत्वाचा आहे.

उदय जगताप यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत, गणेश मंडळे ही समाजसेवेच्या रक्तवाहिन्या आहेत. आम्ही शहरातील बेरोजगारी, गुन्हेगारीचे प्रश्‍न सोडविण्याबरोबरच गडचिरोलीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. नक्षलग्रस्त गावात वीज पोहोचवली. तेथील आरोग्याचे प्रश्न सोडविले. ज्यांच्या हातात बंदूक होती, त्यांच्या हातात पेन दिले. हा समाज बदल करण्याचे काम गणेशोत्सव मंडळ करत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या आयोजनात प्रसाद जोशी, अनिल काळोखे, राजेंद्र शिंदे, यशोधन आखाडे, पुरण हुडके, कृष्णा जाधव, राहुल हांडे, रवीन्द्र जावळकर, सचिन शुक्ला, कविता भोर, मैथिली जोशी, शीतल शेळके, अलका नहार, गायत्री येनपुरे, कल्पना बुटाला, निर्मला गुजर, अश्विनी पुसाळकर आदींनी सहभाग घेतला. दिलीप काळोखे यांनी प्रास्ताविक केले. विनायक घाटे यांनी सूत्रसंचालन केले.

शहरी दहशतवाद शहरावर घोंगावतोय – चंद्रकांत पाटील

पुणे हे जलदगतीने विकास साधणारे शहर आहे. या शहरातील शांतता विस्कळीत करण्याचे काम केले जात आहे. शहरी दहशतवाद हा एक नवीन प्रकार आला आहे. हा दहशतवाद शहरावर घोंगावत आहे. येत्या ८ दिवसात शहरात गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांच्या मागे कोण आहे, हे स्पष्ट होईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading