पानिपतवीर दमाजीराव गायकवाड यांना अनोखी मानवंदना
पुणे : हर हर महादेव… छत्रपती शिवाजी महाराज की जय… श्रीमंत दमाजीराव गायकवाड सरकार की जय… पानिपत वीर अमर रहे… अशा गगनभेदी घोषणांनी श्रीमंत गायकवाड सरकार सदरेचा परिसर दणाणून निघाला. सोमयदुवंशी बडोदा संस्थान संस्थापक, सेनाखासखेल, समशेर बहाद्दर, पानिपत वीर श्रीमंत दमाजीराव गायकवाड सरकार व ज्ञातअज्ञात पानिपत वीरांना मानवंदना देण्यात आली.
निमित्त होते, पुण्यातील श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठान, शिवशंभू प्रतिष्ठान, समस्त ग्रामस्थ दावडी निमगाव यांच्या तर्फे गायकवाड दुर्ग दावडी निमगाव खेड येथे आयोजित पानिपत शौर्य दिन मानवंदना कार्यक्रमाचे. यावेळी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गावातून आलेले गायकवाड स्वराज्यघराण्याचे वंशज, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, प्रवीण गायकवाड, माजी सरपंच सुरेश डुंबरे, बाबासाहेब दिघे, डॅा. सुधीर गायकवाड, अनिल गायकवाड, काळूराम गायकवाड, माणिक गायकवाड, रवी गायकवाड, शेखर गायकवाड, अभिषेक गायकवाड यासह माता भगिनी, सरदारांचे वंशज, दावडी निमगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला गायकवाड दुर्गावर गायकवाड घराण्याचा ध्वज फडकावण्यात आला. शिवरायांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन मानवंदना देऊन सुरुवात करण्यात आली. दीप प्रज्वलन, श्रीमंत दमाजीराव गायकवाड यांच्या तैलचित्राचे पूजन, गायकवाड सरकार तख्त व गायकवाड घराण्याचे पारंपरिक शस्त्र पट्टा याचे पूजन तसेच गायकवाड दुर्ग पूजन करण्यात आले. प्रतिष्ठान तर्फे २०१९ साली श्रीमंत गायकवाड सरकार सदरेचा जिर्णोध्दार करण्यात आला. मानवंदनेचे हे सलग चौथे वर्ष आहे.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड म्हणाले, पानिपत हा मराठ्यांचा पराभव नव्हे तर राष्ट्र रक्षणासाठी मराठ्यांनी गाजवलेला अतुलनीय पराक्रम आहे. हे भारतीयांनी नुसते समजून घेऊन उपयोग नाही, तर भविष्यातील पिढ्यांमध्ये ठसवणे गरजेचे आहे. राष्ट्रावर येणाऱ्या संकटाविरुध्द मतभेद विसरुन एकदिलाने लढणे हा राष्ट्ररक्षक मराठ्यांनी दिलेला धडा आजही भारतीयांना दिशादर्शक आहे.
प्रतिष्ठानचे सचिव प्रवीण दत्ता गायकवाड यांनी सोमयदुवंशी गायकवाड यांचे उगमस्थान, देवगिरी ते शिवनेरी, शिवनेरी ते दावडी व दावडी पासून विश्वभर पसरलेल्या गायकवाडांचा इतिहास कागदपत्रांच्या पुराव्या सहित मांडला. सूत्रसंचालन चांदखेड गावचे चंद्रकांत गायकवाड यांनी केले. आभार विलास गायकवाड यांनी मानले.
