माणसाचा कलात्मक दृष्टिकोन विकसित करण्याची गरज ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे
पुणे : वैद्यकीय क्षेत्रामध्ये सध्या माणसाच्या आयुष्याची लांबी वाढविण्याचे काम केले जात आहे. त्याचबरोबर माणसाच्या आयुष्याचा दर्जा वाढविण्याचे कामही करण्याची गरज आहे. दिवसेंदिवस माणसाच्या बोथट होणाऱ्या भावना आणि कलात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी अधिक प्रयत्न झाले पाहिजे, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केली.
पुरंदरे प्रकाशन तर्फे जेष्ठ कर्करोग तज्ञ डॉ. शेखर कुलकर्णी लिखित ‘तिरळ्या आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात झाले. कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी, प्रकाशक अमृत पुरंदरे, लेखक डॉ.शेखर कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. मोहन आगाशे म्हणाले, पूर्वी माहिती कमी आणि अनुभव अधिक असे आयुष्य माणूस जगत होता. त्यातून पूर्वीच्या माणसांनी अनुभव संपन्न आयुष्य जगले. सध्या अनुभव शून्य आणि माहितीचा भडिमार अधिक त्यामुळे आयुष्याचा अनुभव घेता येत नाही. ही परिस्थिती माणसाठी भयानक आहे. साक्षरता अभियानाऐवजी माणूस शहाणा कसा होईल, यासाठी अभियान राबविणे गरजेचे आहे.
गिरीश कुलकर्णी म्हणाले, सांस्कृतिक दुष्काळ सध्या निर्माण होताना दिसत आहे. आपल्याकडे पूर्वी अत्यंत उत्कृष्ट विनोद होता, परंतु त्या विनोदाला आपण केवळ टेलिव्हिजनच्या स्किटमध्ये अडकवून ठेवले आहे. आपल्या आयुष्यातील आशय हळूहळू हरवत चालला आहे. हा आशय पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे.
शेखर कुलकर्णी म्हणाले, मित्रांच्या बाबतीत मी अत्यंत भाग्यवान आहे. विविध क्षेत्रातील अनुभव संपन्न आणि गुणांनी भरपूर असे मित्र मिळाल्यामुळे माझेही आयुष्य अनुभव संपन्न झाले. त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. पुण्याचे संस्कार, बी.जे. मेडिकल मधील वातावरण आणि कलाक्षेत्रातील मित्र यामुळे माझ्यातील डॉक्टर आणि कलाकार यांची जडणघडण होऊ शकली. अनेक रुग्णांनी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्याकडून मिळालेल्या अनुभवातून माझ्याही जीवनाला पैलू पडले यासाठी मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो, असेही त्यांनी सांगितले.
