स्वरझंकार महोत्सवात आर्य संगीत प्रसारक मंडळाचा सन्मान
– पं संजीव अभ्यंकर यांचे गायन व ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं अतुलकुमार उपाध्ये यांच्या बहारदार वादनाने रंगला महोत्सवाचा तिसरा दिवस
पुणे : व्हायोलिन अकादमी आयोजित व बढेकर समूह प्रस्तुत १४ व्या स्वरझंकार महोत्सवात आर्य संगीत प्रसारक मंडळाला ‘रसिकाग्रणी दाजीकाका गाडगीळ पुरस्कार’ प्रदान करीत सन्मानित करण्यात आले. व्हायोलिन अकादमीचे संस्थापक व ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये यांच्या हस्ते भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे पुत्र आणि आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी डी पी रस्त्यावरील पंडीत फार्म येथे आयोजित स्वरझंकार महोत्सवात आजच्या तिसऱ्या दिवशी सदर पुरस्कार स्वीकारला. मानपत्र, पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. व्हायोलिन अकादमीचे संचालक शिरीष उपाध्ये हे देखील या वेळी उपस्थित होते.
पुरस्काराला उत्तर देताना श्रीनिवास जोशी म्हणाले, “१९९२ साली पहिल्या स्वरझंकार महोत्सवाचे उदघाटन माझे वडील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी हस्ते झाले होते. आजवर अनेक दिग्गज कलाकारांनी या महोत्सवात आपली कला सादर केली आहे. आज इतक्या मोठ्या स्वरूपात होत असलेला हा महोत्सव पाहून मला मनस्वी आनंद होत आहे. हा पुरस्कार म्हणजे पंडितजींचा सन्मान आहे असेच मी मानतो.”
स्वरझंकार सांगीतिक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात संगीत मार्तंड पं.जसराज यांचे शिष्य आणि मेवाती घराण्याचे सुप्रसिद्ध गायक संजीव अभ्यंकर यांचे गायन झाले. त्यांनी राग भीमपलासने आपल्या सादरीकरणास सुरवात केली. त्यामध्ये विलंबित एकतालात ‘कगवा बोले मोरी अटरिया…” छोटा ख्यालमध्ये ‘जा जा रे अपने मंदिरवा…’ या बंदिशी त्यांनी प्रस्तुत केल्या त्यानंतर मारवा रागातील विलंबित रूपक ‘पिया नही आये…’, छोटा ख्यालमध्ये ‘ऊन बिन सूनो लागत मेरो धाम…’ बंदिशी त्यांनी सादर केल्या. मीराबाईंची रचना असलेला ‘मैं तो सावरे रंग राची….’ या भजनाने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला.
पं. वसंतराव देशपांडे व भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या आठवणीना उजाळा देताना पं. अभ्यंकर म्हणाले, ” माझ्या शाळेतील एका स्टेजच्या उदघाटन कार्यक्रमासाठी पं. देशपांडे आले होते. त्यावेळी मी गायन सादर केले होते. त्यानंतर पं. देशपांडे म्हणाले होते की, ” या व्यासपीठा’चे उद्घाटन संजीवच्या गाण्याने आधीच झाले आहे, मी तर फक्त औपचारिकता पूर्ण करत आहे. ते पुढे म्हणाले, ” सवाई गंधर्व महोत्सवात पहिल्यांदा कला सादर केल्यानंतर पुढे दहा वर्षांनी मला राष्ट्रीय पुरस्कर मिळाला होता. तेव्हा खुद्द भीमसेन जोशी यांनी मला फोन करून शुभेच्छा दिल्या होत्या. इतक्या मोठ्या माणसाने मला दिलेल्या शुभेच्छा हा माझ्यासाठी दुसरा पुरस्कार होता.”
पं. अभ्यंकर यांना अजिंक्य जोशी ( तबला ), मिलिंद कुलकर्णी ( हार्मोनियम ),धनंजय म्हसकर, साईप्रसाद पांचाळ, निधी हेगडे व मुक्ता जोशी ( तानपुरा व स्वरसाथ ) यांनी साथ केली.
यानंतर पं अतुलकुमार उपाध्ये यांचे बहारदार व्हायोलिनवादक झाले. आपले वडील गुरुवर्य बी एस उपाध्ये यांचा आवडता राग असलेल्या राग बागेश्रीने त्यांनी आपल्या वादनाला सुरुवात केली. यानंतर विलंबित तीन ताल, मध्यलय तीनताल, द्रुततालाचे दमदार सादरीकरण त्यांनी केले. त्यांना मुकेश जाधव (तबला) व राजस उपाध्ये (व्हायोलिन) अशी साथसंगत केली.
