Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

ताल, स्वर व लयींच्या झंकाराने पुणेकर रसिकांची सायंकाळ प्रफुल्लित

पुणे  : ताल, स्वर, लयींचा प्रफुल्लित करणारा आविष्कार आणि हलक्या थंडीसोबतच उत्तरोत्तर रंगत जाणारी सायंकाळ पुणेकर रसिकांनी १४ व्या स्वरझंकार संगीत महोत्सवाच्या निमित्ताने अनुभविली. व्हायोलिन अकादमीच्या वतीने आयोजित व बढेकर ग्रुप प्रस्तुत यावर्षीच्या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात गायिका नबनिता चौधरी यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मधुवंतीने आपल्या गायनाला सुरूवात केली.

राग मधुवंतीमधील ‘सखी कैसे जाऊं’ ही बडा ख्याल मधील बंदिश आणि ‘फुल बंध सेज बिछाऊ…’ ही रचना त्यांनी छोटा ख्यालमध्ये सादर केली. त्यानंतर तराणा सादर करीत ‘भक्ती की रसना श्याम नाम है, प्रेम की रसना राधा…’ या भजनाने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा समारोप केला. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी) तर आदिनाथ वैद्य आणि दिव्या श्रीकांत यांनी तानपुरा अशी साथसंगत केली.यानंतर सुप्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पं विजय घाटे यांची संकल्पना असलेला ‘मेलोडीक रिदम विथ सेल्वा गणेश’ हा अनोखा कार्यक्रम सादर झाला. तालवाद्ये, कथक व तबला यांची जुगलबंदी यावेळी उपस्थितांनी अनुभविली.

स्वर-राग प्रधान कार्यक्रम अनेक महोत्सवात सादर होतात मात्र आमच्या सारख्या कलाकारांना लय-ताल प्रधान कार्यक्रम सादर करण्याची वेगळी संधी मिळत नाही. म्हणूनच आम्ही एकत्र येत आमचा विचार मांडायचा प्रयत्न या कार्यक्रमाद्वारे करीत असल्याचे घाटे यांनी नमूद केले आणि आयोजकांनी ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानले.

सुप्रसिद्ध खंजिरावादक सेल्वा गणेश, तबला वादक पद्मश्री पं विजय घाटे आणि कथक नृत्यांगना शीतल कोलवलकर यांनी सादर केलेल्या या कलाविष्काराला रसिकांनी टाळ्यांचा भरभरून प्रतिसाद दिला.

दुर्गा स्तुतीने या सादरीकरणाची सुरवात झाली. त्यानंतर गणेशवंदना, कृष्णवंदना, भजन, श्लोक, तबला सोलो आणि कथकमधून सवाल- जवाब यांचे दमदार सादरीकरण झाले. अभिषेक शिनकर (संवादिनी), नागेश आडगावकर (गायन), सागर पाटोकर (पढंत) आणि निलेश यादव (ध्वनी) यांनी साथसंगत केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading