Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

‘कलासेतू’द्वारे ईशान्य भारतातील कला रसिकांनी अनुभविली महाराष्ट्राची कलासंस्कृती

पुणे : भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टसच्या विद्यार्थ्यांनी ‘कलासेतू’ या उपक्रमांतर्गत ईशान्य भारतात विशेषतः आसाम मधील विविध विद्यापीठांमध्ये कलेचे सादरीकरण करत, तेथील कला रसिकांना महाराष्ट्राच्या कलासंस्कृतीचे दर्शन घडविले.

महाविद्यालयाच्या सांस्कृतिक आदान प्रदान योजनेअंतर्गत आयोजित या उपक्रमाचे  नेतृत्व स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस’चे संचालक व संवादिनी वादक पंडित शारंगधर साठे यांनी केले होते. या उपक्रमात समन्वयक डॉ. देविका बोरठाकूर, संगीत विभाग प्रमुख प्राध्यापक प्रवीण कासलीकर, प्राध्यापिका स्वरदा कुलकर्णी, डॉक्टर राजेंद्र दूरकर यांच्यासह महाविद्यालयाचे ९ विद्यार्थी सहभागी झाले होते.

स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस् (एसपीए) हे, शास्त्रीय संगीत व नृत्य या विषयांमध्ये प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सर्टीफिकेट कोर्स) ते विद्या वाचस्पती (पी.एचडी) पर्यंतचे अभ्यासक्रम राबवणारे भारतातील एक नामवंत महाविद्यालय आहे. संगीत, नृत्य या कलासंस्कृतीची महाराष्ट्र व ईशान्य भारतामध्ये देवाण-घेवाण व्हावी, या हेतूने महाविदयालयातर्फे ‘कलासेतू’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमांतर्गत गुवाहाटी येथील महापुरुष श्रीमंत शंकरदेव विद्यापीठात पहिला कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. मृणाल बोरा उपस्थित होते. त्यानंतर आसाम मधील ‘सत्रीय’ या शास्त्रीय नृत्य प्रशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ‘संगीत सत्र’ या जुन्या आणि नामवंत संस्थेच्या परंपरागत वास्तूमध्ये, दिब्रुगड विद्यापीठ, अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथील राजीव गांधी विश्वविद्यालय, गुवाहाटी जवळील विश्वनाथ या ठिकाणी असलेले कृषी महाविद्यालय, काझीरंगा येथील ‘ऑर्किड पार्क’ पर्यटन महोत्सव अशा विविध ठिकाणी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी आपल्या कलेचे सादरीकरण केले. यामध्ये भरतनाट्यम, कथक, शास्त्रीय संगीत, तालवाद्य कचेरी, मराठी लोकसंगीत व नृत्य तसेच आसाम मधील सत्रीय नृत्य, बीहू गीत यांचा समावेश होता. स्थानिक कला रसिकांचा या सादरीकरणास भरभरून प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमांतर्गत अभिनय सोसायटी गुवाहाटी, संगीत सत्र गुवाहाटी, बरनाली डान्स अकॅडमी यांच्यातर्फे पं. शारंगधर साठे यांना संगीत व नृत्य प्रशिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी विशेष मानचिन्ह व गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या दौऱ्यामध्ये पं. साठे यांनी आसामचे सांस्कृतिक मंत्री बिमल बोराह यांची भेट घेत, पुण्यामध्ये ईशान्य भारत सांस्कृतिक केंद्र सुरू व्हावे, अशी मागणी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading