fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENTLatest News

१३ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार ‘साथ सोबत’

टिझरपासून ट्रेलर रिलीज होईपर्यंत कायम चर्चेत राहिल्याने प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करणारा ‘साथ सोबत’ हा मराठी चित्रपट १३ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. आशयघन कथानक, अर्थपूर्ण संवाद, नयनरम्य लोकेशन्स, वास्तवदर्शी चित्र, मनमोहक कॅमेरावर्क, सहजसुंदर दिग्दर्शन, कसदार अभिनय आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या आधारे बनवलेल्या ‘साथ सोबत’ला प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांची कौतुकाची थाप मिळत आहे. राष्ट्रीय पुरस्कारावर आपलं नाव कोरणाऱ्या दिग्दर्शक रमेश मोरे यांनी ‘साथ सोबत’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

प्रसन्न वैद्य यांची प्रस्तुती असलेल्या ‘साथ सोबत’ या चित्रपटाची निर्मिती धनजी मारू यांनी मारू एन्टरप्रायझेस या बॅनरखाली केली आहे. दिग्दर्शनासोबतच ‘साथ सोबत’चं लेखनही दिग्दर्शक रमेश मोरे यांनीच केलं आहे. कोकणातील वास्तव मांडणारा या चित्रपटात ग्लोबल विषय पहायला मिळणार आहे. त्याला एका सुरेख प्रेमकथेची किनार जोडण्यात आली आहे. गाव-पातळीवरील वास्तव चित्र किती भयाण आहे आणि कोकणासारख्या भागात काय परिस्थिती आहे याचं सत्य दर्शवणारा हा चित्रपट आहे. रमेश मोरे यांनी नेहमीच समाजाभिमुख विषयांवर चित्रपट बनवण्याला प्राधान्य दिलं आहे. ‘साथ सोबत’ही त्याला अपवाद नाही. मोहन जोशींनी साकारलेले वयोवृद्ध डॅाक्टर आणि संग्रामच्या रूपातील तरुण डॅाक्टर बरंच काही शिकवणारे आहेत. त्यांना मृणाल कुलकर्णीनं नवोदित असूनही सुरेख साथ दिली आहे. अनिल गवस यांनी साकारलेला पिता तसेच ९०व्या वर्षी राजदत्त यांना अभिनय करताना पहाणं म्हणजे आजच्या पिढीच्या डोळ्यांचं पारणं फेडणारं आहे. अमोल रेडीज, दिलीप आसुर्डेकर आदी कलाकारांनीही या चित्रपटात अभिनय केला आहे. सर्वच कलाकारांची अचूक भट्टी जमल्यानं मोरेंचा हा चित्रपटही पुरस्कार सोहळ्यांमधील गणितं बदलणारा ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पत्नी यशश्री मोरे यांच्यासोबत रमेश मोरेंनी लिहिलेली अर्थपूर्ण गाणी कथानकाच्या प्रवाहाशी एकरूप होणारी आहेत. संगीतकार महेश नाईक यांनी या गाण्यांना सुरेल संगीत दिलं आहे. कोकणातील चिपळूण-सावर्डे आणि आसपासचा निसर्ग मनाला मोहिनी घालणारा आहे. डिओपी हर्षल कंटक यांच्या सिनेमॅटोग्राफीची आणि अभिषेक म्हसकर यांच्या संकलनाची कमाल यात आहे. चिरेबंदी घरांसोबतच जुनं ते सोनं म्हणत आजही ताठ उभी असणारी मातीची घरंही चित्रपटाचं सौंदर्य खुलवणारी आहेत.

संगीतकार महेश नाईक यांनीच पार्श्वसंगीतही दिलं आहे. संतोष चारी आणि सतिश भावसार यांनी रंगभूषा केली असून, यशश्री मोरे यांनी यांनी वेशभूषा केली आहे. कला दिग्दर्शन प्रकाश कांबळे यांनी कला दिग्दर्शन केलं असून, मीनल घाग यांनी नृत्य दिग्दर्शन व केशभूषा अशी दुहेरी जबाबदारी सांभाळली आहे. कौशिक मारू आणि यशश्री मोरे ‘साथ सोबत’चे कार्यकारी निर्माते आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading