‘तेजोमय नादब्रह्म’ कार्यक्रमात आठवणी व सांगीतिक कार्यक्रमाद्वारे उलगडला श्रीधर फडके यांचा जीवनप्रवास
पुणे : ज्येष्ठ संगीतकार-गायक श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली एकाहून एक सरस गीते आणि त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीला रसिकांनी दिलेली दाद यामुळे पुणेकर रसिक प्रेक्षकांच्या आठवड्याची सुरेल सुरुवात झाली. निमित्त होते पृथ्वी एडिफिसच्या अभय केले यांच्या वतीने ज्येष्ठ संगीतकार गायक श्रीधर फडके यांच्या ७२ व्या वाढदिवसाचे व ४० वर्षांहून अधिक सांगीतिक वाटचालीचे औचित्य साधत आयोजिलेल्या ‘तेजोमय नादब्रह्म’ या कार्यक्रमाचे.
स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी श्रीधर फडके यांच्या पत्नी चित्रा फडके, सुप्रसिद्ध पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल, गायिका अनुराधा मराठे, ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर, राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे, प्रसिद्ध मराठी लेखक- कवी प्रवीण दवणे, गायिका शैला दातार, पृथ्वी एडिफिसचे अभय केले, अर्चना केले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते फडके यांचा पुणेरी पगडी, शाल- श्रीफळ व मानपत्र देत सन्मान करण्यात आला.
‘देवाचीये द्वारी उभा क्षणभरी… ‘, ‘सत्य शिवाहून सुंदर हे…’, ‘ मी तर प्रेम दिवाणी…’ या एकाहून एक सरस गीतांनी कार्यक्रमाला सुरुवात झाली.
लहानपणापासूनच घरामध्ये स्वर कानावर पडत गेले, त्याचा उपयोग पुढे झाला असे सांगत श्रीधर फडके म्हणाले, “मुंबईत आमच्या शिवाजी पार्कच्या घराशेजारी गदिमा राहायचे. त्याशिवाय अनेक दिग्गजांची ये- जा असायचीच. त्यामुळे जे सुंदर आजूबाजूला निर्माण झालं ते सतत मनात झिरपत गेलं. चाल कानाला ऐकायला बरी वाटतेय ना, मनाला सुंदर वाटतेय ना… इतकंच डोक्यात असायचं. रागदारी संगीत शिकलो नसलो तरी ही एक गोष्ट नेहमीच मनात असायची.”
आपल्या पहिल्या संगीतरचनेबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले की, ज्ञानेश्वर माऊलींच्या ‘देवाची द्वारी उभा क्षणभरी…’ या अभंगाला मी पहिल्यांदा फिलाडेल्फियात शिकत असताना चाल दिली. त्यावेळी बाबूजींचा तिथेच एक कार्यक्रम होता, ते म्हणाले मी गातो आणि अशा पद्धतीने ज्ञानेश्वर माऊलींचे शब्द न बाबूजींच्या आवाज अशा पद्धतीने माझी पहिली रचना सर्वांसमोर आली.
‘फिटे अंधाराचे जाळे… ‘ या गीताच्या आठवणी सांगताना फडके म्हणाले, “याची चाल आधी मला सुचली आणि त्यावर सुधीर मोघे यांनी शब्द लिहिले. बाबूजींनी व आशाताईंनी ते गायलं आणि तो चित्रपट मला मिळाला. वडील असले तरी बाबुजींचा ऑरा वेगळा होता. ते एक अजब रसायन होते. त्यामुळे मी त्यांना दबकूनच असायचो. अनेकदा आई व माझी पत्नी यांना मी आधी चाली ऐकवायचो पण पुढे त्यांना आवडली तरी वडीलांना चाल ऐकवायची हिम्मत काही व्हायची नाही.”
शांताबाईंकडे साहित्य सहावासमध्ये ऑफिस संपवून आम्ही कामासाठी भेटायचो तेव्हा त्यांनी लिहून बाजूला टाकलेले कागद मी चाळत बसायचे. त्यावेळी मला एक गाणं मिळालं त्यांनी मला आवडलं म्हणून घेऊन जा अस सांगितलं आणि श्रीधरला ही ते आवडल, त्याने मध्यरात्री २ वाजता त्याला चाल बांधली. ते गीत म्हणजे ‘जय शारदे वागेश्र्वरी..’ अशी आठवण चित्रा फडके यांनी सांगितली.
यावेळी दृकश्राव्य माध्यमातून ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
आमच्याकडून तू खूप सुंदर गाणी गाऊन घेतलीस असे सांगत ऑडियो व्हिडिओ स्वरूपात उपस्थित असलेले
सुरेश वाडकर म्हणाले, “श्रीधर फडके यांनी जेवढे खाजगी कार्यक्रम केले तेवढ काम चित्रपट सृष्टीत केलं असतं तर आम्हाला आज ते मोजता आलं नसतं. माझ्या या मित्राकडून चित्रपट सृष्टीने आणखी काम करून घ्यायला हवं होतं आणि त्यांनी ते करून घेतलं नाही, तुला फार मान सन्मान दिला नाही याची खंत कायम आम्हाला आहे आणि हे चित्रपट सृष्टीचे मोठे नुकसान आहे.”
श्रीधर काका परफेकशनिस्ट आहेत, मी त्यांना मुद्दाम सांगितलं आहे की, काही चुकलं तर स्टेजवर सांगू नका असे मिश्किलपणे म्हणत महेश काळे म्हणाले, “मी बहुदा शाळा कि कॉलेजला होतो. श्रीधर फडके यांचा दिवाळी पहाटचा कार्यक्रम पुण्यात होता आणि त्यांना कोरस गायला काही मुलं हवी होती. तेव्हा मी पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो. त्यानंतर जेव्हा जेव्हा त्यांचा पुण्यात कार्यक्रम व्हायचा तेव्हा मी कोरस गायला जायचो.” यांनतर त्यांनी ‘ अकार उकार मकार योगियांची स्थिती ..’ ही रचना सादर केली. २१ वर्षांनंतर मी हे गाणं आज पुन्हा गायलं असही काळे यांनी सांगितले.
माझी दुसरी ओळख म्हणजे ‘मी राधिका…’ ही श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली रचना आहे असे सांगत ‘ताने स्वर रंगवावा… ‘ हा समर्थ रामदासस्वामींचा अभंग आरती अंकलीकर टिकेकर यांनी सादर केला.
श्रीधर फडके हे असे संगीतकार आहेत ज्यांना आपल्या गाण्याचं चित्र कसं दिसलं पाहिजे हे आधीच कळतं. त्या गीताचा शब्द, लय, झोल, मेढ, शब्दोच्चार हे त्यांना सुस्पष्ट दिसतात आणि ते गायकाकडून तसचं गाऊन घेतात. त्यांच्या मनासारखं चित्र उमटल्याशिवाय ते पुढच्या ओळीला हात घालत नाहीत. त्यांच्यामध्ये एक निरागस लहान मूल आहे आणि ते हट्टी पण आहे. अनेकदा त्यांनी याच हट्टीपणाने माझ्याकडून गाणं गाऊन घेतल आहे. ‘मी राधिका’ या गाण्यातली ‘कळेना सुचेना’ ही ओळ मी लाडीकपणे गायली आहे असं त्यांचं म्हणणं होत आणि ती राहुंद्यात हा माझा हट्ट त्यांनी पुरवला अशी आठवण आरती अंकलीकर टिकेकर यांनी सांगितली.
श्रीधरजींसोबत काम करायची पुष्कळ संधी मला मिळाली असे सांगत गायिका अनुराधा मराठे म्हणाल्या, “आयुष्यभर बाबूजींच्या सहवासात राहूनही श्रीधर फडके यांनी स्वतः ची वेगळी वाटचाल केली. त्यांच्या संगीतामध्ये बाबूजींची सुरेलता आहे, गोडवा आहे पण वाटचाल वेगळी आहे. श्रीधरजी विविध सूर निवडतात. ते नेहमी गाणं बारकाईने समजावून सांगतात.”
आपल्या सत्काराला उत्तर देताना श्रीधर फडके म्हणाले, “माझ्या ४८ वर्षांच्या कारकिर्दीत घरच्यांची साथ तर लाभलीच शिवाय व्यासपीठाच्या समोर बसलेल्या प्रेक्षकांच्या डोळ्यातला आनंद माझ्यासाठी मोठा आशीर्वाद आहे.“
कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध गायक कलाकार शिल्पा पुणतांबेकर, मधुरा दातार आणि मंदार आपटे यांनी गीतांच्या माध्यमातून फडके त्यांचा सांगीतिक प्रवास उपस्थितांसमोर उलगडला. यावेळी त्यांना मिलिंद कुलकर्णी व विनया देसाई यांनी समर्पक साथ दिली. तर तुषार आग्रे, अभिजित सावंत (तबला), संदीप मेस्त्री (हार्मोनियम), वरद कठापूरकर (बासरी), ओंकार पाटणकर, तुषार दीक्षित (सिंथसायझर) तर आदित्य आपटे (विविध तालवाद्य) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुकन्या जोशी यांनी केले.
