संभाजीनगर विमानतळाच्या नामांतरणाची सद्यस्थिती पंधरा दिवसात कळवा; डॉ. नीलम गोऱ्हे
नागपूर: विधान परिषदेत नियम 106 अन्वये सिंधुदुर्ग विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्यासंदर्भातील शासकीय ठराव सोमवारी विधान परिषदेत मंजूर करण्यात आला.
यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सभागृहाला सांगितले की, विमानतळांना महापुरुषांची नावे देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. परंतु हे केवळ कागदोपत्री राहू नये. सुमारे तीन वर्षांपूर्वी संभाजीनगर येथील विमानतळाला ‘धर्मवीर संभाजीराजे भोसले’ यांचे नाव देण्याचा ठराव पारित करण्यात आला होता. परंतु अद्याप त्यावर अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. याकडे विरोधी पक्ष नेत्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. या प्रकरणाची दखल घेत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शासनाला आदेश दिले की, राज्य शासनाने केंद्र सरकारकडून संभाजीनगर विमानतळाच्या प्रलंबित नामांतरणाची सध्या काय स्थिती आहे. याची माहिती पंधरा दिवसात उपलब्ध करून द्यावी.
