fbpx

स्क्रीनवरचा ‘He-man’ असलेला धर्मेंद्र ख-या आयुष्यात ‘गुड Human बिईंग’


पुणे: एखादी व्यक्ती आपल्याला किती जीव लावू शकते, हे मी धर्मेंद्र यांच्या रूपाने अनुभविले आहे. एक व्यक्ती म्हणून त्यांचा लाभलेला सहवास आणि त्यांच्या व्यक्तित्वाचे झालेले दर्शन यावरून स्क्रीनवर ‘He-man’ असलेला अभिनेता धर्मेंद्र ख-या आयुष्यात मात्र एक ‘गुड ह्युमन बिईंग’ आहे, असे सांगत पुण्यातील सुप्रसिद्ध वास्तुविशारद महेश नामपूरकर यांनी धर्मेंद्र आणि त्यांच्या नात्याचा ३० वर्षांचा पट उलगडून दाखविला. निमित्त होते धर्मेंद्र यांच्या ८७ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित गाणी, गप्पा आणि दिलखुलास गोष्टी हा कार्यक्रम पार पडला.

महेश नामपूरकर यांनी गप्पांमध्ये थेट धर्मेंद्र यांनाच फोन लावल्याने पुणेकरांना दूरध्वनीच्या माध्यमातून धर्मेंद्र यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देता आल्या. पुणेकरांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानत धर्मेंद्र यांनीही आपण लवकरच पुण्याला भेट देणार असल्याचे सांगितले. एम एन इव्हेंट्सच्या वतीने धर्मेंद्र यांच्या ८७ व्या वाढदिवसाचे व शर्मिला टागोर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कार्यक्रमांचे आयोजन केले होते. उमा नामपूरकर यादेखील या वेळी उपस्थित होत्या

वास्तुविशारद म्हणून काम सुरू केल्यानंतर मला माझी पहिली प्रोफेशनल फी ही अभिनेता धर्मेद्र यांनी दिली असे सांगत नामपूरकर म्हणाले, “कोणत्याही क्षेत्रातील नवोदित व प्रामाणिकपणे काम करणा-या व्यक्तीला धर्मेंद्र हे नेहमीच प्रोत्साहन देतात. आज चित्रपट सृष्टीतील मोठमोठे कलाकार केवळ यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्यांना भेटायला येतात. या सर्वांना सुरुवातीच्या काळात मनात कोणताही विचार न आणता तू निश्चिंत काम कर मी तुझ्या सोबत आहे असा विश्वास धर्मेंद्र यांनी दिलेला होता आणि म्हणूनच हे सर्वजण त्यांना मानणारे आहेत.”  

इतक्यात झालेल्या भेटीत तुमची काय चर्चा झाली असे विचारले असता नामपूरकर म्हणाले की, अब वो जमाना नहीं रहा… असे धर्मेंद्र मला म्हणाले, कैसा जमाना नहीं रहां? असे विचारल्यावर ते पुढे म्हणाले, “आधी लोक एकमेकांना भेटले की त्यांच्या चेह-यावरून हावभावावरून आपल्याला अनेक गोष्टी समजून जायच्या. आता माणूस फोन, इमेजच्या माध्यमातून भेटतो. भेटला तरी प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्याने एक दुरावा निर्माण झाला आहे. आधी नात्यांमध्ये एक ऊब होती आता ती हरवत चालली आहे.”

गप्पांच्या या कार्यक्रमासोबतच धर्मेंद्र यांचा जीवनपट उलगडणारी ‘मै जट यमला पगला दिवाना…’, ‘पल पल दिल के पास…’, ‘गर तुम भूला ना दोगे…’, ‘अब के सजन सावन में…’ अशी सदाबहार गाणी सादर झाली. गायक मकरंद पाटणकर, विवेक पांडे, प्रीती पेठकर यांनी सादर केलेल्या गीतांना अमन सय्यद (की बोर्ड), असिफ इनामदार (ऑक्टोपॅड) तर गोविंद कुडाळकर (तबला, ढोलकी) यांनी संगत केली. सिद्धार्थ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: