शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विचार करणा-या संकल्पनांना वाव द्यावा – प्रा. क्रिस्टर नायग्रेन
पुणे : स्वीडनमध्ये प्राथमिक शिक्षणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण विचारांची संस्कृती रुजली आहे. शिक्षण क्षेत्रातील सर्व भागधारकांनी नावीन्यपूर्ण होण्यासाठी त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे आवश्यक आहे. नावीन्यनिर्मितीच्या प्रक्रियेत एकमेकांवर दोषारोप न करता अपयश स्वीकारणे आवश्यक आहे. शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांच्या मोठ्या आणि खोलवर विचार करणाऱ्या संकल्पनांना वाव द्या आणि शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून अपयश स्वीकारणे सहज केले पाहिजे, असे मत स्वीडनच्या मालार्डेलेन युनिव्हर्सिटीचे प्रा. क्रिस्टर नायग्रेन यांनी व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळीच्या वतीने स्वीडनच्या मालार्डेलेन युनिव्हर्सिटीचे प्रा. क्रिस्टर नायग्रेन यांच्या “विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती संस्कृती कशी निर्माण करावी : द स्वीडिश मॉडेल” या विषयावर विशेष व्याख्यान लेडी रमाबाई हॉल येथे आयोजित करण्यात आले होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन, वेलिंगकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, मुंबईचे समूह संचालक डॉ. उदय साळुंके तसेच शिक्षण प्रसारक मंडळी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे विश्वस्त, प्राचार्य, उप प्राचार्य, प्राध्यापक आणि अधिकारी उपस्थित होते.
प्रा. क्रिस्टर नायग्रेन म्हणाले, स्वीडनने मोठ्या प्रमाणावर सह-उत्पादन मॉडेल वापरले आहे ज्याला ट्रिपल हेलिक्स मॉडेल म्हटले जाते. विद्यापीठ, सार्वजनिक क्षेत्र आणि कॉर्पोरेट क्षेत्र यांचा सहयोग यात असतो. यामध्ये तिन्ही क्षेत्र एकत्रितपणे संशोधन करुन माहिती गोळा करतात आणि त्याचे विश्लेषण केले जाते. अशा सहकार्यातून नावीन्यपूर्ण ज्ञान समोर येते. तंत्रज्ञान क्षेत्रात मुलींनी मोठ्या संख्येने वळायला पाहिजे. तंत्रज्ञान क्षेत्रात मुलींची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न व्हायला हवेत. समाज बदलण्यासाठी विद्यार्थ्यांपासून सुरुवात करा त्यासाठी अनुशासनात्मक विचारांची गरज आहे.
ॲड. एस. के. जैन म्हणाले, ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण महत्त्वाचे ठरेल. विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण संस्कृती विकसित करायला हवी. विद्यार्थ्यांची मानसिकता नोकरी शोधण्यापेक्षा रोजगार निर्मितीकडे वळवली पाहिजे असेही त्यांनी सांगितले. डाॅ. उदय साळुंके यांनी विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण संस्कृतीचा विस्तार करणाऱ्या मालार्डेलेन विद्यापीठासोबत १५ वर्षे जुना सहयोग चालवण्याबाबतचा त्यांचा अनुभव उपस्थितांना सांगितला. प्रा. संज्योत आपटे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विद्या आवसरे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला तर प्रा. सुनील गायकवाड, प्रभारी प्राचार्य, स. प. महाविद्यालय यांनी आभार मानले.
