Thursday, May 28, 2026
Latest NewsSports

कर्तृत्वाच्या जोरावर उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिला क्रिकेटपटू किरण नवगिरेचा सन्मान

पुणे: महिला क्रिकेटमधील धोनी अशी ओळख मिळवलेल्या सोलापूर जिल्ह्यात एका खेड्यातील मुलीची भारतीय महिला क्रिकेट टी२० संघात निवड झाली. आपल्या कर्तृत्त्वाच्या जोरावर सोलापुरातील मिरे ते इंग्लंड असा प्रेरणादायी प्रवास करणाऱ्या महिला क्रिकेटपटू किरण नवगिरे हिचा पुण्यात सन्मान करण्यात आला.

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्यावतीने महिला क्रिकेटर किरण नवगिरे हिचा सन्मान आझम कॅम्पस येथे करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव, नियती जाधव, सुधीर साकोरे, योगेश निकम, शेखर पवार उपस्थित होते. शाल, मानाचा फेटा व सन्मानचिन्ह असे सन्मानाचे स्वरूप होते.

भारतीय महिला क्रिकेट संघ हा इंग्लंड दौऱ्यावर टी-२० आणि एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यामध्ये प्रथमच किरण नवगिरेचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर मार्च २०२३ मध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये देखील किरण आपली कामगिरी दाखविणार आहे.

निवृत्ती जाधव म्हणाले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वर येऊन महिला क्रिकेट संघात आपली ओळख निर्माण करणाऱ्या किरण नवगिरे या मराठी मुलीला प्रोत्साहन देण्यासाठी या सन्मान सोहळ्याचे आयोजन केले. किरण नवगिरे यांना पुढील वाटचालीसाठी ट्रस्टच्यावतीने शुभेच्छा.

सन्मानाला उत्तर देताना किरण नवगिरे म्हणाली, छोट्या गावातून आल्यामुळे अडचणी तर येणारच परंतु कुटुंबाचा पाठिंबा असल्यामुळे मला क्रीडा क्षेत्रात करियर करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. आता पुणे मुंबई सारख्या शहरात मुलांइतकीच मुलींना देखील खेळण्यासाठी सुविधा मिळते. त्यामुळे मुलींनी देखील सकारात्मक भावना मनात ठेवून क्रीडा क्षेत्राकडे करिअर म्हणून बघितले पाहिजे असेही, त्यांनी सांगितले. करिश्मा शेख यांनी सूत्रसंचालन केले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading