दहा तारखेनंतर आंदोलनाची वेळ येणार नाही; राज ठाकरे यांचे रिक्षा संघटनेला आश्वासन
पुणे : शहरात अनधिकृतरित्या बाईक टॅक्सी (दुचाकी) सेवा दिली जाते. या सेवेला राज्य शासनाची परवनागी नाही. स्वस्त आणि जलद सेवा असल्यामुळे नागरिक बाईक-टॅक्सीला प्राधान्य देतात. पण, मोटार वाहन कायद्यानुसार खासगी वाहनांचा वापर करून प्रवासी सेवा देणे हे बेकायदेशीर आहे. त्यामुळे अवैध बाईक-टॅक्सी बंद करण्याची मागणी रिक्षा संघटनांकडून केली जात आहे. या संदर्भात रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी दहा तारखेनंतर आंदोलनाची वेळ येणार नाही, असे आश्वासन रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींना दिले.
बाईक-टॅक्सी सेवा ही महिलांसाठी सुरक्षीत नाही. तसेच, अशा बेकायदा बाईक टॅक्सीमुळे रिक्षाचालकाच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे संघटनांचे म्हणने आहे. याविरोधात रिक्षा संघटना एकवटल्यामुळे आरटीओकडून वेळोवेळी बाईक टॅक्सीवर कारवाई करण्यात आली. तसेच, संबंधीत कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, ही सेवा पुर्णपणे बंद व्हावी, यासाठी रिक्षा संघटनांकडून आंदोलन करण्यात आले होते. बेकायदेशीररित्या सुरू असलेली बाईक-टॅक्सी सेवा पुर्णपणे बंद करण्याच्या मागणीसाठी आज रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधीनी राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान राज ठाकरे यांना रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी रिक्षा चालकांना येणाऱ्या समस्यांबाबत सांगितले. यावेळी राज ठाकरे यांनी यात लक्ष घालून आंदोलन सोडविण्याचे आश्वासन दिले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत आमची भेट झाली. या भेटीत आम्ही शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर दुचाकी टॅक्सीबाबत आम्ही आमची भूमिका मांडली. यावेळी राज ठाकरे यांनी स्वतः यात लक्ष घालतो, आणि तुम्हाला दहा तारखेनंतर आंदोलनाची वेळ येणार नाही, असे देखील आश्वासन यावेळी राज ठाकरे यांनी दिले आहे. असे रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले.
