पुनर्निर्माण प्रकल्पामुळे शहर अधिक सुंदर होण्यास मदत – चंद्रकांत पाटील
पुणे : “ शहरात मोठ्या प्रमाणात पुनर्निर्माण प्रकल्प चालू आहेत. एका बाजूला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प (एसआरए) आणि दुसरीकडे पुनर्निर्माण प्रकल्प यामुळे पुणे शहर सुंदर होण्याबरोबरच अधिकाधिक लोकांना सामावून घेण्याची त्याची क्षमता वाढणार आहे,’’ असे मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
गोखले कन्स्ट्रक्शन्स’तर्फे करिष्मा सोसायटी जवळ, कोथरूड येथे उभारण्यात येत असलेल्या तेजलकुंज या निवासी प्रकल्पाचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, सह-पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, संदीप खर्डेकर, महेश पोटे, माजी नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, गोखले कन्स्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले, संचालिका पूनम गोखले व मोनिका मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबईप्रमाणे पुण्यातही एसआरए प्रकल्पांमध्ये एक मजला हा व्यावसायिक असावा, ज्यामुळे उत्पन्न निर्माण होण्यास मदत मिळेल. तसेच या प्रकल्पातील इमारतींची देखभाल करण्यास हातभार लागेल. त्याअनुषंगाने महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांनी प्रयत्न करावे, असेही पाटील यांनी यावेळी सूचित केले. तेजलकुंज या निवासी प्रकल्पामध्ये १२ मजल्याच्या ३ इमारती आणि एकूण ७२ सदनिका अत्याधुनिक सोयीसुविधांसह उपलब्ध असणार आहेत. इंडियन ग्रीन बिल्डींग कौन्सिलच्या (आयजीबीसी) प्लॅटिनम मानांकनाचे निकष लावून उभारण्यात येणारा या परिसरातील हा पहिलाच प्रकल्प असेल असे विशाल गोखले यांनी नमूद केले.
