भारताचे संविधान सर्वसमावेशक – डॉ. प्रतापसिंह साळुंखे
पुणे: भारत असा देश आहे जिथे एका ठिकाणी हिमवृष्टी होते तर दुसऱ्या ठिकाणी वाळवंट आहे, भारतात अनेक जाती धर्माचे लोक आहेत, एकीकडे खडकाळ जमीन आहे तर दुसरीकडे सुपीक इतकी विविधता असूनही भारत हा सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे, याचे मूळ हे भारताच्या संविधानात आहे असे मत खाईस्ट विद्यापीठाचे विधी विभागाचे प्रमुख डॉ.प्रतापसिंह साळुंखे यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासानाच्या वतीने संविधान दिनाच्या निमित्ताने डॉ.साळुंखे त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, डॉ.प्रभाकर देसाई, चारुशीला गायके, अध्यासानाचे प्रमुख डॉ.मनोहर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यापीठातील संविधान स्तंभाला अभिवादन करत उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
यावेळी डॉ.साळुंखे म्हणाले, श्रीलंकेचे संविधान तेथील जनतेने सात वर्षानंतर नाकारले, मात्र भारतातील संविधान हे आजही तेवढेच ताकदीचे असल्याचे त्यांनी आहे. काहीवेळा संविधानातील वाक्यांचे, नियमांचे स्वतःच्या सोयीनुसार अर्थ लावले जात असल्याबाबतची नाराजीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
डॉ.कारभारी काळे म्हणाले, संविधानामुळेच आपण जगात सशक्त भारत म्हणून वावरत आहोत. या ताकदवान लोकशाहीची मूळ जननी भारत असून नागरिकांनी खऱ्या अर्थाने संविधान जगण्याची गरज आहे, आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी याचा अंगीकार करायला हवा. मात्र जेव्हा आपण मूलभूत अधिकारांबाबत बोलतो तेव्हा आपल्या कर्तव्याचाही आपल्याला विसर पडता कामा नये असेही डॉ.काळे यांनी यावेळी सांगितले. डॉ.मनोहर जाधव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली
