चार हजारहून अधिक नागरिक धावणार ‘संविधान सन्मान दौड’..!!
पुणे:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज होणाऱ्या (शनिवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२२) भारतीय संविधान दिनानिमित्त ‘संविधान सन्मान दौड’ चे आयोजन करण्यात आले आहे. या दौडसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत चार हजार विद्यार्थी व नागरिकांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली असल्याची माहिती डॉ.बाबसाहेब आंबेडकर स्टडीजचे प्रमुख डॉ.विजय खरे यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे व पुणे जिल्हा हौशी अथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारताच्या संविधानाबाबत जनजागृती होण्याच्या दृष्टीने या संविधान सन्मान दौडचे आयोजन केले आहे.
विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळील संविधान स्तंभापासून या दौडची सुरुवात होणार आहे. यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत या दौडला सकाळी ५.३० वाजता सुरुवात होईल. यामध्ये विविध देशांतील विद्यार्थी, सैन्यदलातील अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर पुण्यातील अनेक मान्यवर देखील या दौडमध्ये सहभागी होतील.