fbpx

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबीयांनी दिली ‘ही’ माहिती

पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवू नये, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे. काही माध्यमांमधील वृत्त आणि बॉलिवूडमधील अभिनेत्यांच्या ट्विटमुळे सोशल मीडियावर गोखले यांच्या प्रकृतीबाबत उलटसूलट चर्चा सुरू झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास जाणवत आहे. त्यातच त्यांना जलोदर झाल्यामुळे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली होती.

रात्री उशीरा त्यांची तब्येत खालवली असल्याचं वृत्तही आलं. काही बॉलिवूडमधील अभिनेत्यांच्या ट्विटवरून प्रसारमाध्यमांनी त्यांचे निधन झाल्याचं वृत्त दिलं. दरम्यान, सोशल मीडियावरील चर्चेनंतर अखेर कुटुंबीयांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एनआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, विक्रम गोखले यांच्या मुलीने त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती दिली आहे.

‘ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे, ते व्हेंटिलेटरवर असून अद्याप त्यांचे निधन झालेले नाही. त्यांच्यासाठी प्रार्थना करत रहा,’ अशी माहितीत्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. तसेच कृपया त्यांच्या निधनाबाबत अफवा पसरवू नये, असं आवाहन देखील गोखले यांच्या कुटुंबीयांनी केलं आहे.

विक्रम गोखले यांचा अल्पपरिचय

विक्रम गोखले यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४७ रोजी झाला. त्यांनी चित्रपट मालिका आणि नाटक या सर्व व्यासपीठावर काम केले आहे. गोखले यांना चित्रपटांबरोबरच नाटकांमध्येही अत्यंत नावाजलेले कलाकार म्हणून ओळखलं जातं. त्यांनी रंगभूमीवर फार मोठा काळ गाजवला. मराठी सिनेसृष्टीबरोबरच अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली.

Leave a Reply

%d bloggers like this: