fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

ग्योथं इन्स्टिट्यूट मॅक्स म्युलर भवनतर्फे ‘क्रिटिकल झोन्स’ प्रदर्शनाचे आयोजन

पुणे  : मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणावर होणाऱ्या गंभीर परिणामांकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले आहे. मात्र अलीकडील काळात विविध नैसर्गिक आपत्तींमुळे या विषयाकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. विविध ठिकाणच्या पर्यावरणीय समस्या भिन्न असून, स्थानिक पातळीवरील पर्यावरणीय समस्या जाणून घेत,त्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने पुण्यात ‘क्रिटिकल झोन्स – इन सर्च ऑफ कॉमन ग्राउंड ‘ या अनोख्या फिरत्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्योथं इन्स्टिट्यूट मॅक्सम्युलर भवनतर्फे आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन नुकतेच कुडजे गाव येथील झपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालय येथे झाले. जर्मनी येथील झेडकेएम आर्ट अँड मीडिया सेंटर’च्या क्युरेटर मिरा हर्ट्झ, पुणे येथील ग्योथं इन्स्टिट्यूट मॅक्सम्युलर भवनच्या संचालिका मिरीयम ब्रूम्स, झपुर्जा कला आणि संस्कृती संग्रहालयाचे क्युरेटर राजीव सुतार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

प्रदर्शनाच्या उदघाटनप्रसंगी सूक्ष्मजीव, खारफुटी वनांची जटील रचना, निसर्गातील विविध घटक, रासायनिक प्रक्रिया असे विविध घटक कला आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपस्थितांना अनुभवायला मिळाले.

याप्रसंगी बोलताना क्युरेटर मिरा हर्ट्झ म्हणाल्या , “ हे प्रदर्शन केवळ पर्यावरणीय समस्यांवर भाष्य करण्याबाबत नाही, तर मनुष्य म्हणून पृथ्वीवरील जीवसृष्टीत आपले स्थान नेमके काय आहे, हे जाणून घेण्याचा देखील एक प्रयत्न आहे. सध्याच्या समस्येच्या काळात आपली एक कृती जीवसृष्टीवर गंभीर परिणाम करू शकते. मात्र यातील आंतरसंबंध जाणून घेण्यासाठी आपल्याकडे योग्य धोरण, संशोधन, अभ्यास आहे का? याचा शोध घेण्याची गरज आहे. आपल्याकडे आपल्या शारीरिक आरोग्याची तपासणी करण्यासाठी विविध साधने उपलब्ध आहेत, पण ज्या जीवसृष्टीत आपण राहतो, तिच्या आरोग्याचा विचार करणे ही देखील आपलीच जबाबदारी असून, त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अशावेळी कला हे याबाबतचे एक उत्तम साधन बनू शकतू, जी तुम्हाला या विषयाचे ज्ञान, विविध कल्पना प्रदान करते.”

क्युरेटर राजीव सुतार म्हणाले, “ फ्रेंच तत्त्वज्ञाच्या संकल्पनेतून निर्माण झालेले आणि पर्यावरणाशी निगडीत असणारे एक खूप महत्वाचे असे हे प्रदर्शन आहे. या प्रदर्शनाबाबत माहिती मिळाल्यावर ते झपुर्जा येथे व्हावे, अशी माझी इच्छा होती. त्यानुसार याठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत, आम्ही हे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनातील कलाकृतींमध्ये बरेच वैविध्य आहे. आपण नेहमी ज्या गोष्टी बघत असतो, त्याच गोष्टी कलेच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारे याठिकाणी मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे बारकाईने बघितल्यास हे प्रदर्शन अतिशय प्रभावी ठरते.’’

हे प्रदर्शन १८ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत होणार असून, यांतर्गत कार्यशाळा, चर्चासत्र, हेरिटेज वॉक, चित्रपट प्रदर्शन, अभ्यास दौरा असे विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या प्रदर्शनाची मूळ संकल्पना झेडकेएम सेंटर’चे ब्रुनो लेटोर आणि पीटर विबेल यांची आहे. ग्योथं इन्स्टिट्यूटच्या दक्षिण आशियाई केंद्रांसाठी ग्योथं इन्स्टिट्यूट मुंबई’ च्या सहकार्याने या संकल्पनेची पूर्नरचना करण्यात आली आहे. या फिरत्या प्रदर्शनासाठी भारत आणि श्रीलंकेतील कलाकार, डिझायनर, शास्त्रज्ञ आणि कार्यकर्ते यांनी महत्वाचे योगदान दिले आहे. आतापर्यंत मुंबई आणि कोलंबो या शहरांत हे प्रदर्शन भरविण्यात आले असून, पुणे शहरानंतर नवी दिल्ली, कोलकाता आणि बेंगलोर येथे देखील हे प्रदर्शन भरविले जाणार आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाचे प्रमुख संयोजक हे मिरा हर्ट्झ आणि ग्योथं इन्स्टिट्यूट मॅक्स म्युलर भवन, पुणे’च्या दारिया मिले या आहेत.

या प्रदर्शनाचे मुख्य उद्दीष्ट हे भारत आणि श्रीलंका देशांमधील प्रमुख शहरांमध्ये पर्यावरणीयदृष्ट्या ‘क्रिटिकल झोन’ असलेली ठिकाणे ओळखून त्यांच्याबाबत माहिती घेणे, पर्यावरण संवर्धनविषयक जनजागृती करणे आणि स्थानिक नागरिकांमध्ये पर्यावरण संरक्षण आणि सहजीवन याबाबत जागरूकता निर्माण करणे हे आहे. या प्रदर्शनाअंतर्गत दर शनिवारी, हवामान बदल आणि पर्यावरणाशी संबंधित चित्रपटांचे स्क्रीनिंग आणि विविध कार्यशाळा आयोजित केल्या जातील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading