सत् चित आनंद हेच जीवनाचे अंतिम सत्य – डॉ. विजय भटकर यांचे विचार
पुणे : चेतनेचे खरे स्वरूप ज्ञान आणि प्रज्ञानातच आहे. अंतिम सत्य काय आहे हेच शोधण्याचा प्रयत्न मानव करीत असतो. आनंद हे सदैव मानवजातीला लोहचुंबकासारखे आकर्षीत करीत असतो. त्यामुळे सत् चित आनंद हेच अंतिम सत्य आहे.”असे विचार जागतिक कीर्तिचे संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (डब्ल्यूपीयू)च्या एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस अँड अल्टिमेट रियॅलिटी, पुणे तर्फे देशात प्रथमच आयोजित जागतिक दर्जाची ‘कॉन्शियसनेसः द अल्टिमेट रियॅलिटी’ या दोन दिवसीय परिषदेच्या समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. तसेच एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस – द अल्टिमेट रियॅलिटीचे संचालक डॉ. जयंत खंदारे व प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. दीपक रानडे उपस्थित होते.
डॉ. विजय भटकर म्हणाले,“विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय साधून दिलेल्या शिक्षणातून मानव यशस्वी होतो. शोध आणि अनुभव घेतल्यानंतर मानव चेतनेचे द्वार उघडले जाऊ शकते. वैज्ञानिक व भारतीय तत्त्वज्ञान काय आहे, वेद काय म्हणतात, जीवनाचे नाविन्य काय आहे या गोष्टींचा उहापोह होणे गरजेचे . शिक्षणासाठी ज्या दिवशी विदेशातील विद्यार्थी भारतात येतील तेव्हा खर्या अर्थाने हा देश विश्वगुरू बनेल.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी ही परिषद आवश्यक आहे. चंचल मनाला नियंत्रित करण्यासाठी ध्यान गरजेचे आहे. जीवनाचे अंतिम सत्य काय हे पहावयाचे असेल तर मनाच्या खोलीत डोकावे लागेल. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांनी सांगितलेला मार्गच जगाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल.”
डॉ. दीपक रानडे यांनी या दोन दिवसीय परिषदेची माहिती दिली. तसेच पुणे डिक्लेरेशन घोषित केले. त्याला उपस्थितांनी अनुमोदन केले.
दिवसभराच्या सत्रात डॉ. एस.पी. शुल्का, डॉ. दीपक रानडे, डॉ. अमित चौधरी, मोहन उत्तरवार, डॉ. संजय उपाध्ये, प्रा. सिध्दार्थ सिंग, डॉ. एस.एन. पठाण, राजेश भूतकर, गिरीष अत्रे, डॉ. राघव कोली आणि डॉ. जयंत खंदारे यांनी वेगवेगळ्या विषयांवर विचार मांडले. डॉ. सुमन कौल यांनी आभार मानले.
