सरकार आणि पोलिसांना जाब विचारु – जयंत पाटील
मुंबई : रविवारी रात्री कळवा आणि ठाणे शहराला जोडणा-या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळीच होते, आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा कसा, सरकार आणि पोलिसांना जाब विचारु अस राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा तयार ठेवला आहे. परंतु ते आधी शरद पवार यांची भेट घेणार आहेत त्यानंतर चर्चा करून ठरवून निर्णय घेतला जाईल असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले आहे. त्यांना राजीनामा देण्यापासून आम्ही थांबवले आहे. त्यांना समजावण्यासाठी आम्ही आलो आहोत. आपण न्यायाची लढाई लढू, असेही पाटील म्हणाले आहेत
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या पत्रकार परिषदेमध्ये कलम ३५४ या कायद्याची सविस्तर माहिती दिली. काल नेमके काय घडले त्याचाही घटनाक्रम सांगितला. अशा पद्धतीने एखाद्याला बदनाम करणे चुकीचे असल्याचे पाटील म्हणाले. शिवाय ‘हर हर महादेव’ चित्रपटाबाबत जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन असल्याचेही जयंत पाटलांनी सांगितले.
यावेळी बोलताना आव्हाड म्हणाले की, आम्हाला काही कारण नसताना कोठडीत ठेवले. मी सगळं मान्य करेन पण ३५४ हे कलम मान्य करणार नाही. इतक्या खालच्या पातळीचे राजकारण करू नये यामुळे घरं उद्ध्वस्त होतील, असेही आव्हाड यावेळी म्हणाले.
