कॉल सेंटरध्ये नोकरी करणाऱ्या प्रियकराने केले प्रेयसीचे ३५ तुकडे!
नवी दिल्ली : दिल्लीत लिव्ह इन पार्टनरची हत्या करून ३५ तुकडे केल्याची थरकाप उडवणारी घटना उजेडात आली आहे. ही घटना ६ महिने जुनी आहे. महरौली पोलिसांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा वाकर असे मृत तरुणीचे नाव आहे. ती मुंबईच्या मालाड भागात राहण्यासाठी जाणार होती. तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब अमीनने तिची हत्या केली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
दिल्ली पोलिसांच्या एका अधिका-याने मीडियाला सांगितले की, हत्येनंतर आफताबने मृतदेहाचे ३५ तुकडे केले. त्यानंतर ते सलग १८ दिवस दिल्लीच्या वेगवेगळ्या भागांत फेकले. यासाठी तो दररोज मध्यरात्री २ च्या सुमारास घराबाहेर पडत होता. पोलिसांचे न्यायवैद्यक पथक सध्या या घटनेची माहिती गोळा करत आहे.
श्रद्धाच्या वडिलांनी ८ नोव्हेंबर रोजी पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पीडितेची २६ वर्षीय मुलगी श्रद्धा वाकर मुंबईच्या मालाड भागातील एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या कॉल सेंटरध्ये नोकरी करत होती. येथेच तिची भेट आफताब अमीनशी झाली होती.
दोघे काही दिवस मुंबईत राहिल्यानंतर परत दिल्लीला आले होते. येथे ते लिव्ह इनमध्ये राहत होते. पोलिस अधिका-यांच्या माहितीनुसार, श्रद्धाने आफताबकडे लग्नासाठी तगादा लावला होता. यामुळे त्याने कट रचून तिची हत्या केली.
आरोपी आफताबने चौकशीत सांगितले की, ‘अटकेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी त्याने मृतदेहाचे तुकडे करून ते जंगलात फेकले. ती माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. दररोज भांडत होती. याला कंटाळून मी तिची हत्या केली.’
