विवो प्रो कबड्डी स्पर्धेत यु मुंबा संघाचा आठवा विजय, पाटणा पायरेट्स वर सहज मात
पुणे : मशाल स्पोर्टस यांच्या वतीने आयोजित नवव्या विवो प्रो कबड्डी स्पर्धेत साखळी फेरीत खोलवर चढाया आणि भक्कम पकडी याच्या जोरावर यु मुंबा संघाने पाटणा पायरेट्स संघाला ३६-२३ असे सहज हरवित विवो प्रो कबड्डी स्पर्धेत आठवा विजय नोंदविला. मध्यंतराला मुंबा संघाकडे पाच गुणांची आघाडी होती.
श्री शिवछत्रपती क्रीडा नगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेतील साखळी गटात अव्वल स्थानावर असलेल्या पुणेरी पलटणला यु मुंबा संघाने नुकताच पराभवाचा धक्का दिला होता. साहजिकच आत्मविश्वास उंचावलेल्या मुंबा संघाच्या कामगिरीबाबत उत्कंठा निर्माण झाली होती. माजी विजेता पाटणा संघ अनपेक्षित कामगिरी नोंदवण्याबाबत ख्यातनाम मानला जातो. सुरुवातीला मुंबा व पाटणा या दोन्ही संघांनी सावध पवित्रा घेतला होता. दहाव्या मिनिटाला मुंबा संघाने ७-६ अशी एक गुणाची आघाडी घेतली होती. त्यानंतर त्यांनी ही आघाडी वाढविण्याचा प्रयत्न केला. मध्यंतरास एक मिनिट बाकी असताना त्यांनी पाटणा संघावर पहिला लोण चढविला. पाटणा संघाच्या खेळाडूंनी केलेल्या चुका मुंबा संघाच्या पथ्यावर पडल्या. मध्यंतराला मुंबा संघाने १८-१३ अशी आघाडी घेतली होती.
उत्तरार्धात सुरुवातीपासूनच मुंबा संघाने आघाडी वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. तथापि पाटणा संघाच्या जिगरबाज खेळाडूंनी चिवट लढत कायम ठेवली. सामन्याच्या तिसाव्या मिनिटाला मुंबा संघाकडे सहा गुणांची आघाडी होती. शेवटची सहा मिनिटे बाकी असताना मुंबा संघाने आणखी एक लोण नोंदविला. त्यावेळी त्यांच्याकडे बारा गुणांची आघाडी होती. मुंबा संघाची आघाडी तोडण्यात पाटणा संघाला यश मिळाले नाही.
मुंबा संघाकडून गुमान सिंग याने चौफेर चढाया केल्या तर मोहित कुमार, किरण मगर यांनी भक्कम पकडी केल्या. पाटणा संघाचा अष्टपैलू खेळाडू रोहित गुलिया व सचिन कुमार यांना मर्यादित यश लाभले.
