Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

बाल-युवा कलाकारांच्या सुरेल सादरीकरणाने ‘विरासत’ महोत्सवात रंगत

पुणे : बाल-युवा कलाकारांच्या बहारदार वादन आणि सुरेल गायनाने आजची सायंकाळ संस्मरणीय ठरली. निमित्त होते ‘विरासत’ महोत्सवाचे!
भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचार आणि प्रसारासाठी बहुमूल्य योगदान देत असलेल्या चंदिगड येथील प्राचीन कला केंद्रातर्फे शास्त्रीय संगीत आणि नृत्यावर आधारित दोन दिवसीय ‘विरासत’ महोत्सवाचे पुण्यात प्रथमच आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचा समारोप आज (दि. 13) पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने झाला. तत्पूर्वी बाल-युवा कलाकारांनी केलेल्या सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद देत टाळ्यांच्या गजरात कौतुकाचा वर्षाव केला. प्राचीन कला केंद्राच्या संस्थापक शोभा कोसर, सचिव सजल कोसर, प्रसिद्ध सतार वादक सुब्रतो डे उपस्थित होते.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात नृत्यविभूषण राजसी वाघ आणि त्यांच्या शिष्यांच्या भरतनाट्यम्‌‍ नृत्याविष्काराने झाली. त्यानंतर पुण्यातील प्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार पंडित उदय रामदास यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘परंपरा’ हा आठ ते पंधरा वर्षे वयोगटातील कलाकारांचा बहारदार वादन आणि सुरेल गायनाचा कार्यक्रम झाला. वेगवेगळ्या रागांवर आधारित रचनांचा यात अंतर्भाव होता. यमन रागातील गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यात चतरंग प्रकारातील साहित्य, सरगम, बोल आणि तराना यांचा अंतर्भाव होता. त्यानंतर दुर्गा रागातील दोन रचना सादर करण्यात आल्या. सोहना व सानवी कुलकर्णी भगिनींनी सतार वादनातून देस रागातील रचना सादर करून आपला वेगळा ठसा उमटविला. मल्हार रागातील मध्यलयीतील ‘सावन की बुंद बरसन लगी’ ही त्रिवट रचना कलाकारांनी सादर केली. त्यानंतर ‘सांज भयी घीर आये बदरा’ या रचनेतून राधेची विरहवेदना प्रस्तुत करण्यात आली. भूप रागातील जुगलबंदीने सादरीकरणाचा समारोप करण्यात आला. यात इशान मोडक, नारायणी कुलकर्णी, इशिता मोडक, गायत्री टिळक (गायन), अर्जुन ताबीब (हार्मोनियम), आलाप चौधरी (बासरी), पवन झोडगे (पखवाज), सोहम गोराणे (तबला), सानवी कुलकर्णी, सोहना कुलकर्णी (सतार), रुचिर इंगळे (व्हायोलिन) यांचा सहभाग होता. उदय रामदास आणि बाल कलाकारांचा सन्मान प्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आला.
‘विरासत’ महोत्सवाचा समारोप पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या शास्त्रीय गायनाने झाला. त्यांना प्रशांत पांडव (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी) यांनी साथ केली.

प्रसिद्ध तबला वादक पंडित विभव नागेशकर, प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित विकास कशाळकर, प्रसिद्ध हार्मोनियम वादक गुरू पंडित डॉ. अरविंद थत्ते, प्रसिद्ध भजन आणि लोककलावंत पंडित बाळासाहेब वाईकर आणि अखिल भारतीय सांस्कृतिक संघाचे रत्ना वाघ आणि हेमंत वाघ यांना नक्षत्र सन्मान डॉ. प्रदीप वाघ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कलाकारांच्या वतीने प्रातिनिधीक मनोगत पंडित विकास कशाळकर यांनी व्यक्त केले. देशात शास्त्रीय संगीताची गोडी कमी होत आहे, असा समज या महोत्सवाने खोडून काढला आहे, असे ते म्हणाले. डॉ. प्रदीप वाघ म्हणाले, कलावंत हे सरस्वतीचे पुजारी असून संगीत कलेची ‘विरासत’ नव्या पिढीमुळे कायम पुढे नेली जाणार आहे.
पंडित उदय रामदास म्हणाले, बाल-युवा कलाकार भारताचे भविष्य आहे. त्यांना घडविण्यात त्यांच्या गुरूंचे व पालकांचे मोलाचे योगदान आहे. कलेची संस्कृती प्रत्येक घराघरातून जतन केली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्राचीन कला केंद्राचे सचिव सजल कोसर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading