शिंदे – फडणवीस सरकार कधीपर्यंत टिकणार अजित पवार यांनी सांगितले लॉजिक
शिर्डी: राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी राज्यातील शिंदे सरकार शिर्डी अधिवेशनानंतर कोसळणार असल्याचं भाकीत केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं असतानाच राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.
अजित पवार म्हणाले, मीसुरुवातीला सांगितलं. जोपर्यंत 145 चा आकडा एकनाथराव शिंदे यांच्या पाठी आहे, तोपर्यंत सरकार चालेल. जेव्हा हा आकडा कमी होईल तेव्हा सरकार पडेल. हे मी सुरुवातीपासूनच सांगत आहे, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. अजित पवार शिर्डीत आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
राज्यात 75 हजार नोकऱ्या देण्याचा भाजपने प्रचार केला. ती चालू प्रोसेस असते. मधल्या काळात महाराष्ट्रातून मोठी इंडस्ट्री परराज्यात जात आहे. यामुळे सरकारला त्यांचचं मन त्याना खायला उठल आहे. म्हणून ते या नोकर भरतीचा प्रचार करत आहेत. भरती संदर्भात दोन वेगवेगळी नाव असताना एक नाव सांगून जनतेची दिशाभूल करतायत. असा आरोप त्यांनी केला.
दीड-दीड लाख मुला मुलींना रोजगार मिळणार होते, असे प्रकल्प बाहेर गेले आहेत. आता सांगतात की दुसरे प्रकल्प आणणार आहोत. किती आणि कोणते प्रकल्प महाराष्ट्रात आणणार याची यादी द्या असे आव्हान देखील अजित पवार यांनी यावेळी दिले.
सध्या देशात आणि राज्यात बेरोगजारी वाढत आहे. गेल्या महिन्याचा सर्वे बघितला तर समजेल की बेरोजगारीनं कळस गाठला असल्याचे अजित पवार म्हणाले. विविध विभागाच्या ठिकाणी मंत्री जात आहेत आणि लेटर देत आहेत असं राज्यात कधीच घडलं नव्हतं असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
सरकार फक्त घोषणा करत आहे. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या काळात सरकारनं शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे. मात्र, शेतकऱ्यांना मदत देतील असे वाटत नाही, असे अजित पवार म्हणाले. पंचनामे करण्यासाठी जाणारे अधिकारी पैसे मागत असल्याचे अजित पवार म्हणाले. आजही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये पाणी आहे. शेतकऱ्यांच्या खिशात सध्या पैसे नसताना अधिकारी पैसे मागत असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.
