कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह दोघांना न्यायालयीन कोठडी
पुणे : व्यावसायिक व शेअर दलालाचे अपहरण करून 20 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला कुख्यात गुंड गज्या ऊर्फ गजानन पंढरीनाथ मारणे याच्यासह दोघांना मोक्का न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने मारणेला 16 ऑक्टोबर रोजी साताऱ्यातील वाई परिसरातून त्याला ताब्यात घेतले होते. अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केल्यानंतर सुरुवातीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर केले.
त्यावेळी त्याला आणि मयूर जगदीश जगदाळे (रा. होळकरनगर, आंबेगाव पठार) या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. बचाव पक्षातर्फे ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी बाजू मांडली. या प्रकरणात यापूर्वी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत 38 वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे.
