Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

भारतीय संस्कृती जपणारे खरे श्रीमंत  – ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड.नंदू फडके

पुणे : प्रत्येक माणसाने आयुष्यात रुपये-पैसे किती मिळविले, हे फारसे महत्वाचे नाही. ती माणसाची खरी संपत्ती नव्हे. तर, आपली भारतीय संस्कृती जोपासणारे नागरिक ख-या अर्थाने श्रीमंत आहेत. अनेक भागांमध्ये आपले सण-उत्सव साजरे देखील केले जात नाहीत. मात्र, पुण्याच्या पूर्व भागात भारतीय संस्कृती विविध सण-उत्सवांच्या माध्यमातून जपली जात आहे, असे मत ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. सदानंद उर्फ नंदू फडके यांनी व्यक्त केले.

प्रभात जन प्रतिष्ठान व प्रभात मित्र मंडळातर्फे शहराच्या पूर्व भागातील १५० गरजू महिलांसाठी आगळा-वेगळी भाऊबीज या उपक्रमाचे आयोजन महात्मा फुले पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उद्योजक प्रकाश कुतवळ, राहुल येमूल, मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उत्सवप्रमुख दत्ता काळे, कृष्णा परदेशी, मंगेश शिंदे, रवींद्र भन्साळी, हेमराज साळुंके, ओंकार नाईक, अविनाश निरगुडे, विवेक फुले, विजय चौधरी, कुणाल जगताप, अजय गंधे आदी उपस्थित होते. पै.भरत चौधरी, राजेंद्र परदेशी, खेळाडू अथर्व बोगम यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

अ‍ॅड.नंदू फडके म्हणाले, भारत हा आपला देश आहे, ही आपुलकीची भावना आपल्यामध्ये नाही. त्यामुळे आपला देश मागे पडत आहे. जातीभेद हा हिंदू समाजावर कलंक असून तो भेद दूर सारुन विविध सण – उत्सवांच्या माध्यमातून आपण आपुलकी जपायला हवी.

प्रकाश कुतवळ म्हणाले, समाजातील गरजूंना मदत करण्याकरिता अनेकजण तयार असतात. मात्र, ही मदत योग्य माणसाच्या हातात जाणे गरजेचे असते. आज श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आहे, तर गरीबांना जगण्याची भ्रांत पडली आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भावना समाजात जागृत होणे गरजेचे आहे. स्वत:साठी प्रत्येकजण मोठा होतो. मात्र, सर्वसामान्यांसाठी काम करणारे व्यक्तिमत्व आपण व्हायला हवे.

किशोर चव्हाण म्हणाले, दिवाळीचा दिवा प्रत्येक घरात प्रकाशित झाला पाहिजे, या उद्देशाने हा उपक्रम १० वर्षांपूर्वी सुरु करण्यात आला. साडी-चोळीसह २२ ते २३ वस्तू तसेच शिधा असलेले किट महिलांना दिले जाते. दिवाळी हा वर्षभराची उर्जा देणारा सण असून ती उर्जा सर्वसामान्यांच्या घरातही निर्माण व्हावी, याकरिता प्रतिष्ठान व मंडळ कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. निलेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading