एएसजी नेत्र रुग्णालयातर्फे स्वच्छता अभियान रॅली
पुणे : एएसजी नेत्र रुग्णालय स्वच्छ भारत अभियान अंतर्गत एकाच वेळी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ज्ञानेश्वर पादुका चौकातून पुढे मॉडर्न कॉलेज, जंगली महाराज रोड, डेक्कन, फर्ग्युसन कॉलेज रस्ता असा स्वच्छता अभियान रॅलीचा मार्ग होता. पिंपरी-चिंचवडमध्ये पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकापासून सुरुवात होऊन कुंजीर चौक, कुणाल आयकॉन रोड, शिवार गार्डन ते पुन्हा कोकणे चौक असा स्वच्छता रॅलीचा मार्ग होता. रॅलीच्या मार्गावर पसरलेला कचरा सर्व नागरिकांनी गोळा केला. तसेच स्वच्छतेबाबतची जाणीव करण्याबरोबरच व कच-याचे वर्गीकरण याबद्दल या अभियानाद्वारे माहिती देण्यात आली. स्वच्छता रॅलीमध्ये रुग्णालयाचे सर्व कर्मचारी, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध सामाजिक संस्था, युवावर्गासह पुणेकर नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. रॅलीत सहभागी सर्वांनी स्वच्छतेचे कर्तव्य पार पाडण्याची शपथ घेतली. रॅलीत आलेल्या सर्व पाहुण्यांचे रुग्णालय समुहातर्फे स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
देशातील १९ राज्ये आणि ४० शहरांमध्ये विस्तारलेल्या एएसजी नेत्र रुग्णालयाच्या सर्व रुग्णालयांनी या जनजागृती रॅलीचे आयोजन केलेले. एएसजी समुहाने नेहमीच सामान्य लोकांप्रती पूर्ण संवेदनशीलतेने काम केले आहे आणि वेळोवेळी देशभरात विविध जनजागृती मोहिमांद्वारे समाजाला प्रेरणा देण्याचा आणि जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे.