पक्ष संघटनेत केलेल्या कार्याची पावती – मोहन जोशी
पुणे : कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड म्हणजे पक्ष संघटनेत केलेल्या कार्याची पावतीच मानवी लागेल. संसदीय कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, युवा नेते खा. राहुल गांधी व सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी भक्कम केलेला कॉंग्रेस पक्षाचा पाया अधिक विस्तारत व सर्वांना एकत्रित घेउन अधिक मजबूत कॉंग्रेस पक्ष देशात परिवर्तनासाठी ते सिद्ध करतील व त्यातून पुन्हा कॉंग्रेस पक्षाचा सुवर्णकाळ निर्माण होण्याकडे वाटचाल शुरू होईल अशी प्रीतीक्रिया महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केली.
मोहन जोशी म्हणाले की, ‘पक्ष संघटनेची व्यक्ती’ अशी ओळख असणाऱ्या मल्लिकार्जुन खर्गे यांनी ब्लॉक अध्यक्ष ते कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष अशी केलेली वाटचाल सर्वच कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरेल हे निश्चित. संसदीय राजकारणाचा ५० वर्षांहून अधिक अनुभव त्यांना आहे. तसेच कॉंग्रेस पक्षाच्या विविध पदांवरही त्यांनी काम केले आहे. कॉंग्रेस पक्ष संघटन अधिक खोलवर रुजवत व अधिक बळकट करीत धर्माच्या आधारे समाजात फूट पाडणाऱ्या धर्मांध शक्तींना दूर हटवण्याचे मोठे आव्हान त्यांच्या पुढे आहे आणि त्यात ते निश्चित यशस्वी होतील हा विश्वास आहे’, असे मोहन जोशी म्हणाले.
‘महाराष्ट्राशी त्यांचे भावनिक नाते असून कॉंग्रेस पक्षाचे ते महाराष्ट्राचे प्रभारी अनेक वर्षे होते’ असे सांगून मोहन जोशी म्हणाले की, ‘त्यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्ष लोकशाही, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव व सामाजिक समता ही उदात्त मूल्ये रुजवत कॉंग्रेस पक्षाचा सुवर्णकाळ निर्माण करतील. प्रेत्येक नेता व कार्यकर्त्याची त्यांना साथ लाभेल हे निश्चित’ असे मोहन जोशी शेवटी म्हणाले.
