काल रात्री पुण्यात १०५ मिमी पावसाची नोंद; सुदैवाने कोणतीही जिवितहानी हानी – विक्रम कुमार
पुणे : पुणे शहरात काल रात्री ढगफुटीसदृश पाऊस झाला. हवामान खात्याच्या अंदाजा नुसार पुणे शहरात दोन तासात १०५ मिमी इतका रेकॉर्डब्रेक पाऊस झाला. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले. अनेक घरे, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. यावर पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, काल रात्री शहरात मुसळधार पाऊस झाला. मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी हानी व नुकसान झाले नाही.
पुढे बोलताना विक्रम कुमार म्हणाले, पुणे शहरात काल रात्री १०.३० ते १२.३० या वेळेत १०५ मिमी एवढा पाऊस पडला आहे. मुसळधार पावसामुळे १८ वस्त्यांमध्ये पाणी शिरले. तसेच दोन ठिकाणी भिंती पडल्या. मात्र, यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. शहरातील ड्रेनेज लाईनची क्षमता ६० मिमी आहे. आणि काल त्यापेक्षा दुप्पट पाऊस झाल्यामुळे अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले. पुणे शहराला आज यलो अलर्ट देण्यात आला असून संध्याकाळी ६० मिमी इतका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.
दरम्यान, १८८२ नंतर पहिल्यांदाच ऑक्टोबर महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. आजपर्यंत ऑक्टोबर महिन्यात परतीचा २१० मिमी इतका पाऊस होयचा. दरवर्षी पुणे शहरात साधारणतः ७०० मिमी पाऊस होतो. मात्र यावर्षी १००० मिमी इतका पाऊस झाला असल्याचेही विक्रम कुमार म्हणाले.
