Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRANATIONALTOP NEWS

न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड सरन्यायाधीश म्हणून ९ नोव्हेंबर रोजी शपथ घेणार

नवी दिल्ली : राष्ट्रपतींनी न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांची देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली असून न्यायमूर्ती चंद्रचूड ९ नोव्हेंबरपासून पदभार स्वीकारणार असून ते देशाचे ५० वे सरन्यायाधीश असतील. त्यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत असेल. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड याची ८ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणारे न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी ट्वीट करत सांगितलं आहे की, भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून, राष्ट्रपतींनी डॉ. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची ९ नोव्हेंबर २०२२ पासून भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. किरेन रिजिजू यांनी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांना ९ नोव्हेंबर रोजी होणा-या औपचारिक शपथविधीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान मे २०१६ मध्ये न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांचे वडील वायव्ही चंद्रचूड हेही देशाचे सरन्यायाधीश राहिले आहेत.

सर्वाधिक काळ सीजेआय राहण्याचा विक्रमही वायव्ही चंद्रचूडच्या नावावर आहे. १९७८ ते १९८५ या काळात ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एलएलबी केले आहे. १९९८ मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून नामांकन मिळाले. ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशही राहिले आहेत. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड हे शबरीमाला, समलैंगिकता, आधार आणि अयोध्या प्रकरणांसह अनेक मोठ्या खटल्यांमध्ये न्यायाधीश राहिले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading