fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

पंडित भीमसेन जोशी यांच्यामुळेच संगीत क्षेत्रात पुढे जाण्याची दिशा मिळाली – पं. गणपती भट्ट

पुणे  : “ साधारण तीस वर्षांपूर्वी मी पहिल्यांदाच पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात गाणार होतो. कार्यक्रमातील सादरीकरण सुरु होण्यापूर्वी मी कलाकारांच्या खोलीत बसलो असताना, भारतरत्न पं. भीमसेन जोशी तिथे आले. त्यांच्याशी बोलणे सुरु असताना, त्यांनी सांगितले, की “तू राग मालकंस गायले पाहिजे, त्याचा आणखी रियाज कर.’’ मी पंडितजींच्या मार्गदर्शनानुसार गायनाचा रियाज केला. त्यांच्यामुळेच संगीत क्षेत्रात पुढे जाण्याची दिशा मिळाली,’’ अशा भावना किराणा- ग्वाल्हेर घराण्याचे गायक पं. गणपती भट्ट यांनी व्यक्त केल्या.

धारवाड येथील जी.बी. जोशी मेमोरिअल ट्रस्ट, हुबळी येथील क्षमता संस्था, कन्नडा संघ, पुणे, आवर्तन गुरुकुल आणि नानासाहेब आळवणी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याच्या हेतूने आयोजित ‘भीमपलास’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे उदघाटन आज गणेशनगर,एरंडवणे येथील कलमाडी हायस्कूल मधील शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृह येथे झाले. याप्रसंगी प. भट्ट बोलत होते. यावेळी किराणा- ग्वाल्हेर घराण्याचे गायक पं. एम व्यंकटेश कुमार, कन्नड संघ, पुणे’चे अध्यक्ष कुशल हेगडे, उपाध्यक्ष इंदिरा सालीयान, सचिव मालती कलमाडी उपस्थित होते. तब्बल १२ तास चाललेल्या या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील दिग्गज – तरुण कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून पंडितजींना मानवंदना अर्पण केली.

पं. एम व्यंकटेश कुमार म्हणाले, “ पुणे हे पं भीमसेन जोशी यांची कर्मभूमी आहे. याठिकाणी येऊन संगीत सेवा करण्याची संधी मिळणे हे मी माझे सौभाग्य मानतो. पहिल्यांदा सवाई गंधर्व महोत्सवात गाण्यासाठी मला पंडितजींचे मोठे सहकार्य लाभले. त्यांच्या आशीर्वादामुळेच माझ्या संगीतातील दर्जा अधिक चांगला झाला असे मी मानतो. आजच्या तरुण पिढीलादेखील त्यांचे गायन मार्गदर्शन करणारे ठरते.’’

मालती कलमाडी म्हणाल्या, “ कन्नड संघ, पुणेतर्फे कन्नड समाज बांधवांसाठी शिक्षणाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्यातील  विविध कलागुणांना आणि आपल्या पारंपारिक संगीत कलेला जोपासण्यासाठी कावेरी कला क्षेत्राची  स्थापना करण्यात आली आहे. यामाध्यमातून नृत्य, अभिनय, संगीत अशा विविध कलांच्या सादारीकारणासाठी कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत, त्यांना प्रोत्साहन दिले जाते. शास्त्रीय संगीताचा वारसा कलाप्रेमींपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवितो. कला विशेषतः भारतीय कला ही स्वतःमध्ये एक अनोखा कलाप्रकार आहे. हा कलाप्रकार कोणत्याही ‘फ्युझन’चा प्रभाव न पडू देता, त्याच्या मूळ स्वरूपात पुढे नेल्यास तो केवळ भारतीय  नागरिकांनाच नव्हे, तर जगभरातील नागरिकांच्या मानसिक आरोग्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकेल. त्यामुळेच भारतीय कलाप्रकाराचे संवर्धन करण्यायोग्य संस्था बनण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे.’’

कार्यक्रमाची सुरवात बासुरीवादक षड्ज गोडखिंडी यांच्या बासरीवादानाने झाली. त्यांनी राग ‘मिया की तोडी’मध्ये ताल विलंबित झुमरा आणि दृत तीनतालातील बंदिश सादर केली. त्यांना अजिंक्य जोशी यांनी तबल्यासाठी संगत केली. त्यानंतर पं. एम व्यंकटेश कुमार यांचे गायन सादर झाले. त्यांनी सुरवातीला राग अल्हैया बिलावलमध्ये विलंबित झपताल आणि दृत तीनताल सादर केले. त्यानंतर राग जोनपुरीमध्ये विलंबित तीलवाडा आणि दृत तीनताल सादर केले. दासरपद आणि वचन सादारीकारानाद्वारे त्यांनी गायनाचा समारोप केला. त्यांना  सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), भरत कामत (तबला) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात किराणा घराण्याचे गायक पं. जयतीर्थ मेवुंडी यांनी आपले गायन सादर केले. त्यांनी राग पटदीपद्वारे गायनाला सुरवात केली. त्यानंतर राग वृंदावनी सारंग, गौड सारंगमधील बंदिशी, बसंतबहार रागातील पंडित भीमसेन जोशी आणि मन्ना डे यांनी गायलेले गाणे ‘केतकी गुलाब’ सादर केले. कानडी भजन ‘इंदू यणगे गोविंदा’द्वारे त्यांनी गायनाचा समारोप केला. त्यांना मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), पं. रामदास पळसुले (तबला) यांनी साथसंगत केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading