‘भीमपलास’ कार्यक्रमाच्या माध्यमातून पंडित भीमसेन जोशींना सांगीतिक मानवंदना
पुणे : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याच्या हेतूने ‘भीमपलास’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल १२ तास चालणाऱ्या या कार्यक्रमात संगीत क्षेत्रातील काही दिग्गज – तरुण कलाकार करणार आपल्या कलेचे सादरीकरण करतील. हा कार्यक्रम रविवारी, दिनांक १६ ऑक्टोबर रोजी गणेशनगर,एरंडवणे येथील कन्नडा संघ, पुणे’च्या शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृह याठिकाणी सकाळी ९:३० वाजता होणार आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य आहे.
कर्नाटक सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे धारवाड येथील जी.बी. जोशी मेमोरिअल ट्रस्ट, हुबळी येथील क्षमता संस्था यांच्या सहकार्याने कर्नाटक राज्यात गेले वर्षभर पं. भीमसेन जोशी यांच्या स्मरणार्थ सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रम शृंखलेचा एक भाग म्हणून पुण्यात भीमपलास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यात होणाऱ्या या कार्याक्रमासाठी कन्नडा संघ, पुणे, आवर्तन गुरुकुल आणि नानासाहेब आळवणी चॅरिटेबल ट्रस्ट यांचे सहकार्य लाभले आहे.
कार्यक्रमात बासरीवादक षड्ज गोडखिंडी, किराणा- ग्वाल्हेर घराण्याचे गायक पं. एम व्यंकटेश कुमार, किराणा घराण्याचे गायक पं. जयतीर्थ मेवुंडी, किराणा- ग्वाल्हेर घराण्याचे गायिका शिवानी मिरजकर, इंदोर येथील बीनकर घराण्याचे सातव्या पिढीतील सितारवादक उस्ताद मोहासीन खान आणि किराणा- ग्वाल्हेर घराण्याचे गायक पं. गणपती भट्ट हे आपली कला सादर करतील. प्रमुख कलाकारांना अजिंक्य जोशी (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), भरत कामत (तबला), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम ), पं. रामदास पळसुले (तबला), चंद्रकांत चित्ते (हार्मोनियम) आणि पार्थ तरबडकर (तबला) हे कलाकार साथसांगत करतील.
