Sunday, June 14, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याच्या निर्णयाविरोधात शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. यामध्ये निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाद मागण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधीच दिली नाही. तसेच प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची पडताळणी न करताच निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नवा गोठवण्याचा निर्णय घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेने आपल्या याचिकेत केली आहे.

तसेच ही याचिका आजच तातडीने सुनावणीसाठी घ्यावी, अशी मागणीही शिवसेनेच्या वकिलांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता यावर दिल्ली उच्च न्यायालय काय निकाल देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयाऐवजी उच्च न्यायालयात याचिका का दाखल केली, असा प्रश्न सुरुवातीला अनेकांना पडला होता. मात्र, आता याचे कारणही समोर आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे कार्यालय हे दिल्ली उच्च न्यायालयाच्या अखत्यारित येते. त्यामुळे शिवसेनेने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

आता उच्च न्यायालय निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप करणार का, हे पाहावे लागेल. शिवसेनेच्या याचिकेवर सोमवारी किंवा मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने घाईघाईत सगळे निर्णय घेतले. या सगळ्या गोष्टी आम्ही याचिकेत मांडल्या आहेत. त्यामुळे उच्च न्यायालय यामध्ये काहीतरी हस्तक्षेप करेल, अशी आशा शिवसेना नेते अनिल देसाई यांनी व्यक्त केली.

शिवसेनेकडून दिल्ली उच्च न्यायालयात निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाद मागण्यात आली असली तरी दुस-या बाजूला शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे पक्षचिन्ह म्हणून उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूळ असे तीन पर्याय सादर केले आहेत. मात्र हे तिन्ही पर्याय निवडणूक आयोगाच्या यादीत नसल्याचे समोर आले आहे. फ्रीज, सफरचंद, पेन ड्राईव्ह, डस्ट बिन यासारख्या १९७ मुक्त चिन्हांपैकी एकाची निवड ठाकरेंना करावी लागणार आहे. यावरुनही आता न्यायालयीन लढाई रंगणार का, हे पाहावे लागेल.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिंदे गटाची भूमिका ठरवण्यासाठी रविवारी रात्री वर्षा बंगल्यावर बैठक झाली. निवडणूक चिन्हासाठी तलवार, तुतारी आणि गदा या चिन्हांचा विचार सुरू असून, त्यावर लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading