अंधेरी पोटनिवडणुकीत पूर्ण ताकद लावू,! अडचणीच्या वेळी मदत करणे हाच आमचा धर्म -नाना पटोले
मुंबई:अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्या सोबत असणार आहे. याबाबत सोनिया गांधी यांच्याशी आम्ही चर्चा केली आहे, त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला. ही जागा काँग्रेसची आहे, पण आता येथे शिवसेनेला सहकार्य करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.
मित्र अडचणीत आला तर त्याला मदत करणे हाच आमचा धर्म आहे. त्यामुळे कॉंग्रेस पूर्ण ताकदीने शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करेल, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.
आज काँग्रेस नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यानंतर नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांची संवाद साधला.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ‘निवडणूक आयोगावर दबाव आणून शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आले. केंद्र सरकारच्या रुपात एक अत्याचारी आला आहे, त्याला हरवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीच्या रुपात एकत्र आलो आहोत. लोकशाहीत सत्य कधीही पराजित होऊ शकत नाही. भाजपने असत्याच्या मार्गाने सत्ता हाती घेतली. भाजप इतर पक्षांना संपवण्याचे आणि देशाचा नाश करण्याचे काम करत आहे. पण, हे जास्त काळ चालू शकणार नाही,’ असे पटोले म्हणाले.
