fbpx

पौराणिक, ऐतिहासिक व्यक्तिरेखेचा मानसशास्त्रीय अभ्यास करून विषयाची मांडणी व्हावी : डॉ. उमा कुलकर्णी

पुणे : रामायण, महाभारत या कथा भाकड आहेत असा आजच्या काळात समज होताना दिसून येत आहे. ग्रांथिक पुरावे म्हणून या दस्तऐवजाकडे पाहिले पाहिजे. पौराणिक, ऐतिहासिक काळातील घटनांवर लिखाण करताना लेखकाला फारसे स्वातंत्र्य नसते; सत्यापासून फारसे लांब जाता येत नाही. सत्य घटनांमधील दुवे जोडताना लेखकाची प्रतिभा पणास लागते. पौराणिक, ऐतिहासिक घटनांविषयी लिखाण करताना व्यक्तिरेखेचा मानसशास्त्रीय अभ्यास करून विषयाची मांडणी व्हावी, अशी अपेक्षा ज्येष्ठ अनुवादक आणि साहित्यिक डॉ. उमा कुलकर्णी यांनी व्यक्त केली. ऐतिहासिक कादंबरी म्हणजेच सत्य असे समजणे हे धोकादायक आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

विदर्भातील ज्येष्ठ लेखिका अर्चना देव लिखित श्रीकृष्णपुत्र साम्ब याची रोमांचक जीवनगाथा असलेल्या ‘साम्बादित्य’ या कादंबरीचे प्रकाशन गुरुवारी (दि. 6 ऑक्टोबर) एस. एम. जोशी सभागृह, कॉन्फरन्स हॉल येथे ज्येष्ठ अनुवादक आणि लेखक रवींद्र गुर्जर, कॉन्टिनेन्टल प्रकाशन संस्थेच्या संचालक अमृता कुलकर्णी, धनंजय देव, पराग कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी डॉ. कुलकर्णी बोलत होत्या.

डॉ. उमा कुलकर्णी म्हणाल्या, साम्ब म्हटले की, त्याच्या शापाविषयीच बोलले जाते, परंतु लेखिकेने पुराणातील इतिहासाचा कष्टाने अभ्यास करून या कादंबरीची मांडणी केली आहे. अशा लिखाणात संशोधन गरजेचे असते. चिंतन, लेखनाचा आराखडा आणि घटनांच्या अभ्यासासाठी प्रवास करणे लेखनाला पूर्णत्व देते. भारतीय आणि पाश्चात्यांची इतिहास लेखनाची शैली वेगवेगळी आहे. त्यामुळे आपला इतिहास शोधण्याची जबाबदारी भारतीय लेखकांची आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

अर्चना देव म्हणाल्या, श्रीकृष्णपुत्र साम्ब याची व्यक्तिरेखा भावली, परंतु लेखन करताना संदर्भग्रंथ उपलब्ध होतील का या विषयी साशंकता होती पण संदर्भ मिळत गेले. जिथे प्रवासात अडथळा आला तिथे अनेकांच्या सहकार्याने मार्ग सापडला. यदुकुळाचा नाश साम्ब याच्यामुळे झाला हा आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न कादंबरीच्या माध्यमातून केला आहे. साम्ब याची ही रोमांचक, वीर, प्रेम, भक्तीकथा आहे. कुणाला माहित नसलेला श्रीकृष्णपुत्र साम्ब कादंबरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.

अमृता कुलकर्णी यांनी अर्चना देव यांच्या लेखनाची स्तुती करून या कादंबरीच्या वाचनाने वाचकाला आत्मिक आनंद मिळेल अशी भावना व्यक्त केली. मान्यवरांचे स्वागत  मोहन कुलकर्णी, अर्चना देव, अमृता कुलकर्णी,  डॉ. नयना कासखेडीकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा देव-कुलकर्णी यांनी केले.  

Leave a Reply

%d bloggers like this: