fbpx

विवो प्रो कबड्डी लीगच्या नवव्या मौसमाला शानदार प्रारंभ 

बंगळुरू :  मुख्य संयोजक मशाल स्पोर्ट्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शानदार समारंभात विवो प्रो कबड्डी लीगच्या नवव्या मौसमाचे शानदार उदघाटन करण्यात आले. यावेळी सर्व बारा संघांचे प्रतिनिधी तसेच मशाल स्पोर्ट्सचे लीग मुख्य व विवो प्रो कबड्डी लीगचे कमिशनर अनुपम गोस्वामी उपस्थित होते.

 
बंगुळूर येथील कंतीरवा इंडोर स्टेडियममध्ये उद्या ७ ऑकटोबर रोजी गतविजेता दबंग दिल्ली विरुद्ध यु मुंबा या लढतीने स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे. तीन वर्षाच्या खंडानंतर बंगळुरू, पुणे आणि हैद्राबाद या तीन ठिकाणी होणाऱ्या या स्पर्धेसाठी समस्त कबड्डी प्रेमी उत्सुक आहेत. 
 

दबंग दिल्ली संघाचा कर्णधार नवीन कुमार यावेळी म्हणाला की,आमचा संघ गतविजेता असल्यामुळे आमचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे यंदाच्या मौसमातही चांगली कामगिरी करून त्याची पुनरावृत्ती करू. गेल्या वर्षी मी एक खेळाडू होतो. तर यंदा माझ्याकडे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. मला माझा संघ विजेतेपदापर्यंत घेऊन जायचा आहे. वाढत्या जबाबदारी बरोबरच आपली कामगिरी उंचावण्याचा माझा निर्धार आहे.

 
दरम्यान बंगळुरू बुल्स संघाचा कर्णधार महेंद्र सिंग म्हणाला की, आमच्या संघातील मुख्य आक्रमक विकाश कंडोला हा एक उत्कृष्ट खेळाडू असून गेल्या काही सत्रात त्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्याच्याकडून आमच्या मोठ्या अपेक्षा असून तो त्या निश्चितच पूर्ण करेल. 
 

मशाल स्पोर्ट्स लीगचे मुख्य आणि विवो प्रो कबड्डी लीगचे कमिशनर अनुपम गोस्वामी म्हणाले की, प्रेक्षक आणि कबड्डी प्रेमी हा या स्पर्धेचा आत्मा आहे. तीनही  ठिकाणच्या स्टेडियममध्ये चाहत्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे आमचे प्रयत्न आहे. प्रेक्षक आणि चाहत्यांवर आम्ही यंदा लक्ष केंद्रित केले असून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उच्च दर्जाचा खेळ करणे हा एकच मार्ग आहे. दरवर्षी सातत्याने सुधारणा केल्यामुळेच आम्ही प्रेक्षक व प्रायोजकांच्या अपेक्षांची पूर्तता करू शकलो आहोत .

 
या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दिल्ली विरुद्ध मुंबई सामन्यानंतर बंगळुरू बुल्स विरुद्ध तेलगु टायटन्स आणि जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध युपी योद्धाज या लढती सुद्धा रंगणार आहेत. यंदाच्या मौसमासाठी चाहत्यांना बुक माय शो या संकेतस्थळावर तिकिटे आरक्षित करता येणार आहे. स्पर्धेतील सर्व सामन्यांचे स्टार स्पोर्ट्स आणि डिझनी हॉट स्टार वरून रोज सायंकाळी ७.३० वाजता थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: