fbpx

फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया -2022 स्पर्धेमुळे उदयोन्मुख खेळाडूंमध्ये जागरूकता – बायचुंग भुतिया

नवी मुंबई : येत्या काही दिवसात भारतात सुरु होत असलेल्या फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया -2022 स्पर्धेमुळे भारतातील महिला फुटबॉलच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे प्रतिपादन भारताच्या पुरुष फुटबॉल संघाचा कर्णधार बायचुंग भुतिया याने केले आहे.
सर्वानाच प्रतीक्षा असलेल्या या स्पर्धेच्या आयोजनापूर्वी पार पडलेल्या एका उपक्रम सत्रात बोलताना भुतिया म्हणाला की, फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया -2022 ही स्पर्धा भारतात पार पडणे हि ऐतिहासिक घटना असून या स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी भारतीय क्रीडा प्रेमींनी स्टेडियममध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसे ज्यांना शक्य नाही त्यांनी हे सामने टेलिव्हिजनवरून अवश्य पाहावेत. महिला फुटबॉल साठी हि एक नवी सुरुवात असून या निमित्ताने हा खेळ टेलिव्हिजनवर पाहणे आणि भारतीय संघाला प्रचंड पाठिंबा देणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्यच आहे. जितक्या मोठ्या संख्येने फुटबॉल प्रेमी स्टेडियमकडे धाव घेतील तितक्या मोठ्या संख्येने भारतात नवनव्या महिला फुटबॉल पटू तयार होतील आणि भविष्यात महिला फुटबॉलला एक उज्वल भवितव्य निश्चितच मिळेल.
आपल्या कारकिर्दीत अविश्वसनीय आणि नेत्रदीपक गोल करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या भुतियाने भरातातील पालकांना आपल्या मुलींना फुटबॉल खेळण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे आवाहन यावेळी केले.
भुतिया म्हणाला की, दोन मुलींचा पिता असल्यामुळे पालकांनी आपल्या मुलींना लवकरात लवकर कोणता न कोणता खेळ खेळण्यास भाग पाडले पाहिजे असे मला वाटते. त्यातही फुटबॉल सारखा सांघिक खेळ हा एक वेगळी जीवनशैली शिकवत असतो. अर्थात मुलींना त्यासाठी योग्य संधी योग्य वयात मिळणे आणि त्यासाठी पोषक वातावरण असणे हे सुद्धा आवश्यकच आहे. फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया -2022 स्पर्धेबाबत बोलायचे झाल्यास माझ्या दोन्ही मुली फुटबॉलप्रेमी असून त्यांना लवकरात लवकर भारतीय महिला फुटबॉल संघाकडून खेळायचे आहे. मात्र त्यांना तितक्या मोठ्या प्रमाणात महिला फुटबॉल खेळले जात असताना दिसत नाही. तसेच त्यांना प्रेरणा मिळण्याकरिता काही स्टार खेळाडूंची गरज आहे.
भुतिया पूढे म्हणाला की, फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया -2022 या स्पर्धेमुळे माझ्या मुलींप्रमाणेच असंख्य भारतीय मुलींमध्ये फुटबॉल विषयी जागरूकता निर्माण होईल तसेच या स्पर्धेतून त्यांना प्रेरणा देणारे अनेक स्टार खेळाडू उदयाला येतील, असा मला विश्वास वाटतो. मात्र यासाठी भारतातील पालकांनी आपल्या मुलींना क्रीडा क्षेत्रात सहभागी होण्यासाठी पाठिंबा दिला पाहिजे. आमच्या अकादमीत येणाऱ्या खेळाडूंमध्ये मुलांचे प्रमाण खूपच जास्त असले तरी मुली फारच मोजक्या असतात. मात्र या स्पर्धेमुळे अनेक पालकांच्या प्रवृत्तीत बदल होईल आणि त्या आपल्या मुलींना फुटबॉल खेळण्यासाठी पाठवतील असे मला वाटते.
आधुनिक काळातील सर्वोत्तम फुटबॉल पटू पैकी एक असा लौकीक मिळवणाऱ्या भुतियाने अधिकाधिक महिला प्रशिक्षकांची गरज असल्याचे यावर त्याने भर दिला. भारतात आम्हांला प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. ज्यायोगे ते मुलींपर्यंत आपले ज्ञान आणि कौशल्य पोहोचवू शकतील. पण त्याहीबरोबर महिलांच्या फुटबॉलचा विकास होण्यासाठी अधिकाधिक महिला प्रशिक्षक पुढे येणे आवश्यक आहे. कारण मुलींची मानसिकता आणि त्यांच्यासमोरील आव्हाने महिला प्रशिक्षकच समजून घेऊ शकतील. मैदानावरील मुलींना महिला प्रशिक्षकांशी संवाद साधने अधिक सोपे जाईल. या स्पर्धेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कोच एज्युकेशन स्कॉलरशिप प्रोग्रामची त्याने प्रशंसा केली.
फिफा अंडर-17 वुमन्स वर्ल्ड कप इंडिया -2022 स्पर्धेच्या नवी मुंबई, गोवा आणि भुवनेश्वर अशा तीन ठिकाणी होणार आहे. भारतीय संघाचे सर्व सामने भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियम या ठिकाणी होणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: