fbpx

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर; ३ नोव्हेंबरला होणार मतदान

मुंबई : मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार रमेश लटके यांचे १२ मे रोजी दुबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. आता या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

राज्याच्या राजकारणात बदललेल्या समीकरणांमुळे ही निवडणुक चुरशीची होणार आहे.
सध्या शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. तसेच, राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहे. याचाच प्रभाव अंधेरीतील पोटनिवडणुकीत पाहायला मिळणार आहे. शिवसेनेतील बंडानंतरची ही पहिली निवडणूक असल्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. अशातच शिवसेनेत दोन गट झाल्यामुळे ही निवडणुक कशी होणार? ठाकरे आणि शिंदे गट कोणत्या निवडणूक चिन्हाचा वापर करणार? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाची जागा भाजपकडे
आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा सामना होणार होता. मात्र शिंदे गटाची ही जागा आता भाजपने आपल्याकडे घेतली आहे. पोटनिवडणुकीत भाजप आपला उमेदवार उभा करणार आहे. भाजपतर्फे मुरजी पटेल हे उमेदवार असणार आहेत.

तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर शिंदे गटानं इथे उमेदवार देत पोटनिवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र आता ही जागा भाजपनं आपल्याकडे घेतल्याने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत आता शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: